नाशिक - Safe Rangpanchami : महाराष्ट्रात अनेक विभागात प्रथा परंपरेनुसार होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. मात्र मोठ्या शहरात आलेल्या परप्रांतीय संस्कृतीच्या लोकांमुळे लोक धुळुडीच्या दिवशी रंग खेळतात. या सणासाठी काही रंगप्रेमी कोरडे रंग वापरतात तर काहीजण बाजारातून आणलेले रासायनिक रंग वापरतात, मात्र या चमकदार रंगामुळे त्वचा, केसाचे नुकसान होऊ शकते, तसेच डोळ्याला देखील इजा होऊ शकते. त्यामुळे रंग खेळण्या अगोदर काळजी घेणे गरजेचे असल्याचं त्वचारोग तज्ञ श्रद्धा सोननीस यांनी सांगितले आहे.
रंगपंचमी सण देशभरात साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. रंग कोणताही असला तरी त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच डोळ्याचे रक्षणासाठी रंग खेळताना गॉगल लावावेत मात्र लेन्स वापरणाऱ्या व्यक्तीने होळी खेळताना डोळ्यात लेन्स लावू नये, असं डॉक्टर सांगतात.
अशी घ्याल काळजी..
रंग खेळण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीम मॉशिरायझर किंवा खोबरेल तेल चेहऱ्यासह मान,कान तसेच केसांना आणि शरीराचा जो भाग उघडा राहणार आहे त्यावर देखील वापर केल्यास पुढील त्रास होत नाही. शक्यतो गुलालमधील रंग वापरावे ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. केमिकल युक्त रासायनिक ऑइल पेंट रंग वापरू नये, यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. रंग खेळून आल्यावर माईंड सोपने किंवा क्लींजर्सने त्वचा क्लीन करावी, तसेच शरीरातील नाजूक असलेल्या डोळ्यांची देखील रंगपंचमी खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे,रंग खेळताना शक्यतो लेन्स वापरू नये. गॉगल वापर करावा जेणेकरून रंग तुमच्या डोळ्यात जाणार नाही..
कानांचीही घ्या काळजी
रंगपंचमी साजरी करतांना त्वचा,डोळे यासोबतच रंग खेळण्याआधी कानातही थोडेसे तेल लावून कापसाचे बोळे घालणे हितकारक ठरते. सुरक्षेविना खेळताना कानात कोरडे रंग गेले असतील तर आधी कोरड्या फडक्याने तसेच नंतर पाणी लावून काढून टाकावेत. थोडे अधिक खोल रंग दिसत दिसल्यास कानातील उर्वरित रंग काढून टाकण्यासाठी इअरबडचा वापर करावा, असं डॉं श्रद्धा सोननीस यांनी सांगितले.