मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी होणार आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतच माहिती दिली आहे.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस? : महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. यावेळी तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचंही सांगितलं जातंय. इतकंच नाही, तर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार असतील, अशीही चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक : गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं द्यायची? आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा महायुतीची बैठक होणार होती. मात्र, नंतर बैठक रद्द करण्यात आली. आता रविवारी (1 डिसेंबर) एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.
महायुतीत शिंदे नाराज? :दुसरीकडं महायुतीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, "बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीत समन्वय आहे. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत." मात्र, अमित शाह यांना पुष्पगुच्छ देतानाच्या फोटोत एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यामुळं यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळं ते एक-दोन दिवस साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले असल्याची माहिती, उदय सामंत यांनी दिली आहे. परंतु, मनासारखी खाती मिळत नसल्यामुळं आणि गृहमंत्री पद शिवसेनेला मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत आणि यावरुनच ते महायुतीत नाराज असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा
- एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे सर्वसामान्य जनतेला वाटणं स्वाभाविक - गुलाबराव पाटील
- "बहुमत मिळूनही राजभवनात जाण्याऐवजी शेतात...", उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका
- "ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज