महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही, एजन्सीची भीती दाखवली जात आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

Supriya Sule On Rohit Pawar ED Case : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनं खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय.

MP Supriya Sule
सुप्रिया सुळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 8:12 AM IST

पुणेSupriya Sule On Rohit Pawar ED Case :आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीनं जप्त केल्याबाबत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार टीका केलीय. "लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे. जर लोकांचा कल त्यांच्या बाजूनं नसेल, तर एजन्सीचा वापर धमकावण्यासाठी केला जातो. हा लोकशाहीचा विरोधाभास आहे," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केली. "सुडाचं राजकारण इतक्या थराला जाईल, असं वाटलं नव्हतं. दुर्दैवानं रोहित पवार संविधानाच्या चौकटीत बोलतो, म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे," असा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाहीय :"रोहित पवारांची संघर्ष यात्रा यशस्वी झाली. त्यानंतर जेव्हा-जेव्हा ईडीनं रोहित पवारांना बोलावलं, तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे सर्व कागदपत्र ईडीकडं दिली. रोहित यांची तब्बल बारा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत रोहित पवारांनी सहकार्य केलं. तसंच रोहित पवार यांच्यावर आरोप असलेल्या एफआयआरमध्ये त्यांच नाव नाहीय. या एफआयआरमध्ये पृथ्वीराज देशमुख, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, अमरसिंह पंडित, धनंजय दलाल, राजवर्धन कदमभांडे, आदींस अनेकांची नावं आहेत. या FIR मध्ये ज्या लोकांची नावं आहेत, हे सर्व लोक भारतीय जनता पक्षात आहेत," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला

काय आहे प्रकरण ? : कन्नड सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर राज्य सहकारी बँकेनं त्याचा लिलाव केला. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीनं हा कारखाना 50 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी बारामती ॲग्रोची ईडीकडून चौकशी सुरू होती. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीचा आरोप आहे.

हे वाचलंत का :

  1. काँग्रेसनं लोकसभेसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; राहुल गांधी वायनाडमधूनच रिंगणात
  2. आमदार रोहित पवारांना ईडीचा झटका; कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, पवार म्हणाले, "भाजपात जायचं का?"
  3. आमच्यात योग्य समन्वय, चिंता नसावी; दिल्लीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांचं कोल्हापुरात स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details