पुणे Supriya Sule : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. "मला भारतीय जनता पक्षाची गंमत वाटते, कारण मागच्या आठवड्यात त्यांनी लोकसभेमध्ये सर्व देशवासीयांना एक ''व्हाईट पेपर'' दिला होता. त्यामध्ये आदर्श घोटाळा एक मोठा घोटाळा आहे, असा उल्लेख होता. हे त्यांचेच खासदार आणि मंत्री सांगत होते. त्यानंतर लगेच आता अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झालेत. मात्र, ही आता भाजपावाल्यांची स्टाईल झाली आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
खूपच चांगला प्रस्ताव होता : "आरोप करायचे आणि त्या माणसाच्या मागे ईडी, सीबीआई लावायची आणि मग त्या व्यक्तीला भाजपामध्ये घ्यायचं. भ्रष्टाचार मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत या ज्या घोषणा भाजपानं केल्या आहेत, त्याचं उत्तर भाजपानंच दिलं आहे. खरं पाहायला गेल तर भाजपा सर्वसामान्य मायबाप जनतेची फसवणूक करत आहे," असा आरोपही सुळे यांनी यावेळी केलाय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत "भाजपानं मला राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती," असं म्हटलं आहे, यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "खूपच चांगला प्रस्ताव होता."
आमच्याकडं मॅजिक आकडा आहे : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर म्हटलं आहे, ''आगे आगे देखो होता है क्या'' यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "जर कोणी प्रवेश काही करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाजपामध्ये जे लोक पहिल्यापासून काम करत आहेत ते आता 33 टक्केची मागणी करत आहेत. कारण आता भाजपामध्ये जे नवीन लोक येत आहेत, त्यांनाच संधी मिळत आहे. सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांवर आज भाजपामध्ये अन्याय होत आहे," असा टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. दरम्यान, चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे महाविकास आघाडीला फटका बसणार का, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "असं काही होणार नाही, आमच्याकडं मॅजिक आकडा आहे."