महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार, महादेव जानकर तिथून निवडणूक लढवणार नाहीत : अमोल मिटकरी - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणूक 2024 चांगलीच चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनीही आज "बारामतीतून महादेव जानकर नव्हे, तर सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवणार आहेत," असं स्पष्ट केलं.

Lok Sabha Election 2024
आमदार अमोल मिटकरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 2:01 PM IST

आमदार अमोल मिटकरी

पुणे Lok Sabha Election 2024 :बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार याच उमेदवार आहेत, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. महायुतीमध्ये महादेव जानकर परत आल्यानंतर बारामतीतून ते निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. या चर्चेला अमोल मिटकरी यांनी पूर्णविराम दिला. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची महत्त्वाची बैठक आहे, त्या बैठकीपूर्वी अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सातही मतदार संघांवरं आमचा दावा कायम :अमोल मिटकरी म्हणाले, "लोकसभेच्या किती जागा मिळतील आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल, हे बैठकीनंतर समजेल. सातही मतदारसंघांवर आमचा दावा कायम आहे. महादेव जानकर हे बारामतीतून लढणार, या चर्चेला काही अर्थ नाही. परभणीतून ते लढतील." महादेव जानकर बारामतीमधून लढणार, या सगळ्या कपोलकल्पित चर्चा आहेत. आमच्यातीलच एक गट अशा प्रकारच्या कंड्या पिकवतोय. आमच्यातला गट म्हणजे तुतारी गट, असा हल्लाबोलही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केला.

विजय शिवतारेंचा 'मास्टरमाईंड' कोण :विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, "मला त्यांच्या तब्येतीची फार काळजी आहे, ते असं का वागत आहेत. कौटुंबिक कारणांनी वैफल्यग्रस्त असताना अशा प्रकारची विधानं होत असतात. त्यांनी निवडणूक लढवावी. यावेळेस त्यांचं डिपॉझिट ही वाचणार नाही. अजित पवार यांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल, तर तो घ्यावा. मात्र विजय शिवतारेंची इतकी पात्रता नाही. शिवतारेंच्या मागचा 'मास्टरमाइंड' दुसराच आहे. आम्ही बारामतीत प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो 'मास्टरमाईंड' कोण आहे, हे जनतेसमोर आणू. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आता वॉचमन गेटकिपर :खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब फिरत आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, "आता घरातले सगळे संपले आहेत. आता वॉचमन, गेटकिपर, गाय-वासरू, कुक हे सगळेच स्क्रीप्ट देऊन आणतील. कितीही चक्रव्यूह आखा तरी बारामतीचा मतदार अजित पवारांच्या पाठीशी आहे," असा दावा त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare
  2. मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare

ABOUT THE AUTHOR

...view details