अहमदनगर Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी (29 मार्च) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलाय. तसंच, त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय. सुपा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्ष आणि तुतारी चिन्ह असलेला पंचा घालून त्यांचं स्वागत केलं.
शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार : गेले अनेक दिवसांपासून निलेश लंके राजीनामा देऊन शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, यास निलेश लंके हे नेहमीच नकार देत होते. मात्र, शुक्रवारी सुपा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं आणि येथून पुढे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची माफी मागितली : लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुजय विखे यांच्या विरोधात लढवणार असल्याची घोषणाही यावेळी लंके यांनी केली. धनशक्तीविरुद्ध-जनशक्ती अशी ही लढाई होणार असून, आज जनशक्ती माझ्यासोबत असल्याने विखे परिवाराचा पराभव निश्चित केला जाईल, असा विश्वास निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी नगर दक्षिण मतदार संघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे तसंच काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोणतीही कायदेशीर आणि तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून आमदारकीचा राजीनामा देत असल्याबद्दल लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची माफी मागितली.