अहमदनगर Sunita Kurkute :म्हणतात ना जीवनात सदैव आनंदी राहायचं असतं. कारण इथं दुःखाचं गाठोडं प्रत्येकाच्या नशिबी असतं. आयुष्य फक्त जिंकण्यासाठी नसतं कधी हरण्यासाठी तर कधी समजून घेण्यासाठी असतं. ब्युटी पार्लरचे क्लास व काम, शिवणकाम व त्याचे क्लास, पहिली ते बारावीच्या मुलांचे शिकवणी वर्ग. घरकाम, स्वयंपाक, दोन मुले, पती, सासू यांचं आवरून देणे, यातून वेळ काढून एमपीएससीचा अभ्यास करून पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणं ही कहाणी एका दोन्हीही पाय नसणाऱ्या गृहिणीची आहे. आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं परिपूर्ण ताट. त्यात परमेश्वरानं जे वाढलेलं असेल ते खावचं लागतं. मग ते दुःख असो वा सुख, ते स्वीकारलंही आणि आनंदाने पचवलंही.
पाय गमावल्यानंतर कराव्या लागलेल्या संघर्षाविषयी माहिती सांगताना सुनिता कुरकुटे (ETV Bharat Reporter)
बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड :संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील सुनीता सोमनाथ कुरकुटे यांचे कॉलेजचे शिक्षण एसपी कॉलेज बारामती येथे झाले. बारावीत असताना ताय तायक्वांडो कराटेसाठी दक्षिण कोरिया याठिकाणी निवड होऊनही आर्थिक परिस्थिती समोर झुकावं लागलं. त्यातच पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश केला आणि शिक्षण घेत असताना शेतकरी कुटुंबात लग्न करावं लागलं. आता शेतीतच काम करावं लागणार, शिक्षणावर पाणी सोडावं लागणार व भविष्यात पाहिलेली स्वप्न धुळीला मिळणार हे कळत असतानाही लग्नासाठी होकार दिला. लग्नानंतर रोज शेतात राबून शेणमाती करून कष्टाचा पण मी म्हणेन सुखी संसाराचा गाडा ओढण्याचं काम आम्ही पती-पत्नी करत होतो. अशातच मला गावाने बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पद बहाल केलं. सरपंच म्हणून गावातील अडचणीत असणाऱ्या ग्रामस्थांना मदत करत गावाची धुरा मी यशस्वीपणे वाहत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होतं. कदाचित परमेश्वराला देखील माझ्या यशस्वी कारकीर्दीला थांबा द्यावा असं वाटलं असावं.
भरधाव ट्रकने दोघांना चिरडले :सुखी जीवनाच्या वाटेकडे वळण घेत असतानाच अचानक संकटाच्या वर्णांचे घाट लागतात आणि असं काहीसं माझ्या जीवनात घडत गेलं. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांतच केवळ मी आजारी पडण्याचं निमित्त झालं आणि उपचारासाठी दुचाकीवरून नारायणगावला डॉक्टरकडे जात होते. 12 जून 2012 रोजी गाडीला आळेफाटा-जुन्नर रस्त्यावर असताना अनावधानाने कुत्रा आडवा आल्यानं गाडीचे चाक सरकले गेले व आम्ही अलगद रस्त्यावरती पडलो; परंतु त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकखाली चिरडले गेलो. माझ्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीच्या हातावरून चाक गेल्यानं तेही जखमी झाले. उपचाराआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते मयत झाले. या अपघाताने माझे दोन्ही पाय माझ्याकडून हिरावून घेतले. डोळ्यांसमोर अंधार उभा ठाकला. मला काहीही सुचत नव्हते. यशाच्या शिखरापर्यंत चढण्याचे स्वप्न पाहणारे माझे डोळे वेगळीच परिस्थिती अनुभवत होते. भावनांचा कल्लोळ माझ्या मनात साठला होता. पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव मला येत होता. सर्व संपले असं मनही सांगत होतं. पूर्ण अंध:कार दाटून माझं जीवन माझ्यासाठी भयावह झालं होतं.
अखेर पाय गमावल्याचं सत्य स्वीकारलं :या अंधारात आता मी कशी जगणार? आणि जगून काय करू? या प्रश्नाचे उत्तर शोधत मी अंथरुणात पडून असतानाच या डोंगराएवढा दुःखातून मला माझ्या चार वर्षांच्या व सात वर्षांच्या दोन मुलांनी आई तू मरू नकोस, तू आम्हाला हवी आहेस, असं म्हणून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही मोठे झालो की तुला खूप जीव लावू असे बोबडे बोल ते बोलत होते; परंतु त्या लहान जीवांना जीवनाचं सारं काही कळत नव्हतं. त्यांना फक्त आई हवी होती. अशा परिस्थितीत काही आपली जवळची माणसे साथ सोडत होती. बरेचशे घाट घातले जात होते. पाय गेल्याचे दुःख सोसत हॉस्पिटलमध्ये पडून असताना मला चार वर्षाच्या यशने प्रेरणा दिली. मी झोपल्यावर हॉस्पिटलच्या खिडकीतून ॲम्बुलन्समधून जखमी मृत रुग्णांना उतरवताना तो पाहायचा. मी उठल्यावर मला म्हणायचा आई तू रडू नकोस, बरं झालं तू तरी जगली गं. आता बघ दोन माणसे गेली, त्यांचं छोटं मुल आता एकटचं राहिलं. आता त्याला कोणीच नाही? त्याला कोण सांभाळणार? असं म्हणून माझा यश रडायचा आणि मला म्हणायचा फक्त तू मरू नकोस. मुलाने दिलेल्या धिरावर मी माझे पाय गमावल्याचं सत्य स्वीकारलं. नव्या तळमळीने, तडफेने जीवनाचा म्हणण्यापेक्षा संघर्षाचा श्रीगणेशा केला.
हिम्मत न हरता ग्रॅज्युएटचे शिक्षण पूर्ण केले :स्वयंपाक, घरकाम हळूहळू करू लागली. आई-वडिलांनी मला विरोध केला. इथं तुम्ही मदत कराल माझ्या घरी गेल्यावर माझ्या पती आणि मुलांचं काय? असा प्रतिसवाल मी आई-वडिलांना केला, त्यापुढे तेही निरुत्तर झाले. दुःखात बुडण्यापेक्षा कामात स्वतःला गुंतवून घेण्यात मी सुरुवात केली. या अपघाताने माझे सर्वस्वचं माझ्याकडून हिरावून घेतले होते. शारीरिक त्रास तर होताच पण त्याचबरोबर मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. अशातच दोन्हीही पाय गमावलेली दोन मुलांची मी आई अगदी हताश होऊन माझ्या मुलांकडे पाहत असायची. पर्याय काय आता जीवन कुठे वळण घेणार? आता पुढे काय होणार? मला कोणीही सांभाळणार नाही? असे असंख्य प्रश्न भेडसावत होते. तब्बल दोन वर्षानंतर मी सासरी परतले; परंतु मला नेहमी वाटायचे पाय गेलेत पण आपला मेंदू काम करतोय. हार मानून चालणार नाही. अपघात ज्यावर्षी झाला अगदी त्याच्या आधीच्या वर्षी लग्नानंतर सात वर्षांनी तृतीय वर्षाची परीक्षा देण्याचा आग्रह करून पतीकडून त्याबाबत संमती मिळवली होती. जेव्हा निकाल आला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. मग मी हिम्मत न हरता बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले, मुलांची शिकवणी सुरू केली. परीक्षेच्याआधी अवघे दोन महिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. पूर्वपरीक्षा मी सुटलेही. परंतु मुख्य परीक्षा देण्याआधी मला संसार महत्त्वाचा वाटला म्हणून मी सासरी आले. सासरी आल्यावर माहेरपेक्षा जास्त कामाचा झपाटा वाढवला. पहाटे पाच वाजता उठणे, घरकाम, स्वयंपाक करून, पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांची शिकवणी घेणे. शिवणकामासाठी येणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देणे, ब्युटी पार्लरचे काम, संध्याकाळी पुन्हा राहिलेल्या मुलांच्या तासिका असे मी स्वतःला कामात गुंतवून घेतले.
'त्या' देवमाणसाने मिळवून दिले कृत्रिम पाय :आपण दिव्यांग असलो तरी आपली, आपल्या घरच्यांसह समाजाला अडचण वाटू नये. उलट उपयोग वाटावा हीच माझी कायम धारणा होती. अशा परिस्थितीत गरज होती ती कृत्रिम पायांची; परंतु त्यांची किंमत जास्त व परिस्थिती हालाकीची, सांगड काही केल्या बसत नव्हती. मी बसून न राहता बी. एडचे शिक्षण पूर्ण केले. बी. एड. करून मी एक परिपूर्ण शिक्षिका झाले होते. त्यामुळे शिकवणी घेण्यात मला कुठली अडचण येत नव्हती. शेवटी माझी एका देव माणसाशी ओळख झाली ती व्यक्ती म्हणजे विवेक नवरे काका (डोंबिवली). नवरे काका कायमच दिव्यांगांसाठी कार्यरत असतात. त्यांनी स्वतःहून माझी भेट घेण्यासाठी डोंबिवलीवरून माझ्या राहत्या घरी पोहोचले. त्यांनी मला कृत्रिम पाय मिळवून देण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात खरा झाला. त्यांच्याच परिचयातील गांगुर्डे सर व डमडेरे सर या तिघांनी मिळून मला साडेआठ लाख रुपये किमतीचे कृत्रिम पाय मिळवून दिले. केवळ या देव माणसांमुळेच माझे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी माझ्यातली जगण्याची उमेद जागृत करण्याचा प्रयत्न केला व माझा चालण्याचा सराव सुरू झाला. या समाजाने मला भरपूर काहीतरी दिले. त्यामुळे या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. आपण या समाजासाठी काहीतरी करावं असंही मनात यायचं; परंतु समाजासाठी आपण काही करू शकू का? असाही प्रश्न पडायचा. पण मग मनात ठरवलं की, आपण हे करू शकतो. मग पुढे जाऊन वृद्ध, निराधार स्त्री-पुरुष, तसेच दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिलांसाठी सर्व शासकीय योजनांची कार्यप्रणाली शासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगत पातळीवर पुरवण्याचे कार्य मी करायला लागले.
ती माणसं म्हणजे ईश्वरी देणगीच :गावपातळीवर बचत गटांच्या माध्यमातून हिरकणी महिला मंच या मंचाची स्थापना करून महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न मी करत आहे. गरीब मुलांच्या शिकवण्या कमी किमतीत घेऊन तसेच वेळप्रसंगी मोफतही शिकवण्या घेण्याचे कार्य करण्यात मला पराकोटींचा आनंदही मिळतो. ब्युटी पार्लर व शिलाई कामाबरोबरच गरजू महिलांच्या शिकवण्याही घेण्याचे काम मला आनंद देत आहे. माझ्या क्लासमधील बऱ्याच मुलींना पुण्याच्या कल्याणी स्टील कंपनीकडून पुढील पाच वर्षांसाठी दहावीनंतर फ्री स्कॉलरशीप मिळत आहे. माझ्या क्लासमधील मुलींची निवड होणे ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. एवढेच नाही तर खेड्याच्या ठिकाणच्या स्त्रियांचे आणि मुलींचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून मी सॅनिटरी पॅडचे वाटप कमी दरात करत आहे. कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता, न डगमगता त्या संकटाशी दोन हात करून मार्ग काढणं म्हणजे खरं आयुष्य. या संघर्षात साथ दिलेली माणसे म्हणजे एक ईश्वरी देणगी असते.