मुंबईSuccess Story Of Ashfaque Chunawala : एकेकाळी आर्थिक स्थैर्यासाठी ड्रायव्हर म्हणून तात्पुरती नोकरी करणाऱ्या तरुणाची वार्षिक उलाढाल आता 36 कोटींपर्यंत पोहोचली आहे. एवढ्यावरच न थांबता या तरुणानं पुढील वर्षापर्यंत वार्षिक उलाढाल 100 कोटींवर नेण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. अशफाक चुनावाला असं या तरुणाचं नाव आहे. सर्वसामान्य घरातील अशफाक यांनी कंपनीच्या ताफ्यात 500 वाहनं जमा केली आहेत. पुढील वर्षापर्यंत या वाहनांची संख्या 1 हजारापर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
टॅक्सी चालवण्याचा निर्णय :सन 2004 मध्ये चुनावाला यांनी अवघ्या 1 हजार 500 रुपये महिना वेतनावर काम करण्यास सुरुवात केली होती. छोटी मोठी नोकरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची ही परिस्थिती 2013 पर्यंत अशीच होती. 2013मध्ये चुनावाला एका कंपनीत विक्री विभागात व्यवस्थापकाचं काम करत होते. मात्र, मिळणारं उत्पन्न घर चालवायला पुरेसं नसल्यानं त्यांनी सुटीच्या दिवशी वाहन चालक बनून टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं त्यांच्या उत्पन्नात थोडीशी वाढ झाली. केवळ आर्थिक स्थिरता लाभावी म्हणून त्यांनी चालकाचं काम केलं.
व्यवसायाचा केला विस्तार :अशफाक यांना कंपनीतून दरमहा 35 हजार रुपये तसंच पार्ट टाईम चालकाच्या नोकरीतून दरमहा 15 हजार रुपये उत्पन्न मिळू लागलं. त्यानंतर त्यांनी बहिणीकडून काही पैसे घेऊन एक चारचाकी वाहन खरेदी केलं. त्यामुळं त्यांची गाडी हळुहळू रुळावर आली. आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या गाड्या चुनावाला यांच्याकडं चालवण्यासाठी देण्याची सुरवात केली. यातून त्यांच्या व्यवसायचा विस्तार होत गेला. 2019 मध्ये चुनावाला यांच्याकडं अशा प्रकारे 7-8 गाड्या आल्या होत्या.
800 चालकांना मिळाला रोजगार : 2022 पासून त्यांच्या कामाला अधिक वेग आला. एकीकडं मुबलक पैसा मिळू लागल्यानं त्यांनी हा व्यवसाय अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. तसंच समाजाप्रति असलेल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी सर्वसामान्य चालकांसाठी विविध योजना राबवण्याची सुरवात त्यांनी केली. सध्या त्यांच्याकडं 500 चारचाकी गाड्या असून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून 800 चालकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. त्या चालकांना प्रति महिना 25 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळतं. 25 ते 30 चालकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणं कंपनीच्या विविध कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आलय. त्यांना दरमहा 1 ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
कंपनीकडून चालकांना वाहन : सध्या त्यांच्याकडं असलेल्या चालकांना कंपनीकडून वाहन पुरवलं जातं. कर्ज, अपघात अशा बाबींकडं चालकांना लक्ष देण्याची गरज भासत नाही. कारण त्याची संपूर्ण काळजी चुनावाला यांची कंपनी घेते. जोगेश्वरी पश्चिमला चुनावाला यांचं कार्यालय असून सध्या त्यांच्या कार्यालयात 35 जण कार्यरत आहेत. गेल्यावर्षी त्यांची उलाढाल 36 कोटी होती. यावर्षी त्यांना ही उलाढाल 70 कोटींवर न्यायाची आहे. तसंच पुढील वर्षी 100 कोटी वार्षिक उलाढाल करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. सध्या त्यांच्याकडं 500 वाहनांचा ताफा आहे, तो ताफा पुढील वर्षीपर्यंत 1 हजारांवर नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
केवळ पैसे कमावणं धेय नाही : केवळ पैसे कमावणं आपलं धेय नसून तळागाळातील चालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा निर्धार चुनावाला यांनी व्यक्त केला आहे. तसंच समाजाप्रति असलेल्या आपल्या कर्तव्याचं पालन करणं आपलं धेय असल्याचं अशफाक चुनावाला यांनी म्हटलं आहे.
'हे' वाचलंत का :
- कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाला मिळणार ५० लाखांची मदत; आमदार मनीषा चौधरी यांनी केला होता पाठपुरावा - Corona Warriors
- नीट घोटाळ्यानं जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा डागाळली, आरोपी मुख्याध्यापकाचं निलंबन, विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव - NEET Paper Leak Scame
- आधी लगीन लोकशाहीचं...; बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क - Wedding and voting