पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक तसंच शैक्षणिक राजधानी म्हटल जातं. याच पुणे शहरात पुणेकरांसह राज्यातील विविध ठिकाणचे नागरिक हे कामानिमित्त तसंच शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये तर राज्यातील विविध भागातून विद्यार्थी हे अधिकारी बनण्याच स्वप्न घेऊन एमपीएससी, युपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या दैनंदीन जीवनातील खान-पान यावर नजर टाकली असता हे विद्यार्थी वर्षाला सुमारे 26 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा चहा पित असल्याचं वास्तव समोर आलंय. एमपीएससी, युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एमपीएससी स्टुडंट्स राईट' या संस्थेनं पुण्यातील या विद्यार्थ्यांच्या दरोरोजच्या आयुष्यावर एक सर्व्हे केलाय. त्यामध्ये ही माहिती समोर आलीय. एमपीएससी स्टुडंट्स राईट'चे महेश बडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा सर्व्हे केलाय.
जवळपास 50 व्यवसाय अवलंबून : "आम्ही विद्यार्थ्यांच्यावर काम करत असताना विद्यार्थ्यांच्यावर किती व्यवसाय अवलंबून आहेत याचा एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून अस लक्षात आलं की पुण्यात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर मार्केटिंग, बुक्स, क्लासेस, रूम, मेस, हे व्यवसाय अवलंबून आहेत. जवळपास 50 व्यवसाय हे या मुलांवर अवलंबून आहेत. पुण्यात राहणाऱ्या या मुलांची फक्त चहाची उलाढाल पाहिली तर 26 कोटींपेक्षा अधिक रुपयांची असल्याचं समोर आलंय," असं सर्वे करणारे महेश बडे म्हणाले.
तीन वेळा चहा घेत असल्याचं समोर : एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना मोठं ताण असतो. तसंच, अभ्यासही मोठ्या प्रमाणात करावा लागतो. ताण हलका करण्यासाठी तसेच एकटेपणा घालवण्यासाठी ही मुलं चहा पितात. एकटे नव्हे तर सोबत असलेल्या मित्रांनादेखील चहासाठी घेऊन येतात. सर्व्हेमध्ये हे विद्यार्थी एकवेळ नव्हे तर दोन वेळा किंवा तीन वेळा चहा घेत असल्याचं समोर आलं आहे.
10 घटकांवर सर्व्हे : पुणे शहरात एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेले आहेत. शहरात जवळपास 500 अभ्यासिका आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट' या संस्थेकडून विद्यार्थ्यांशी निगडित 10 घटकांवर सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये अभ्यासिका, मेस, मार्केटिंग, सोशल मीडिया आणि रूम अशा गोष्टींचा समावेश आहे. शहरात या विद्यार्थ्यांसाठी जवळपास मेसची संख्या ही 750 आहे. तसंच, हॉस्टेलदेखील या पटीत असून कोरोनानंतर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यामुळे सध्या मुलांची येण्याची संख्या ही कमी झाली आहे. अशा विविध गोष्टी या सर्व्हेतून समोर आल्या आहेत.