बीडStudents March On Panchyat Samiti: पाटोदा तालुक्यातील सौताडा गावातील जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी विषयाला शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. आपण बीड जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या. एकीकडे संपूर्ण ऊसतोड कामगार गावकऱ्यांनी एकत्र येत गावची शाळा, रंगरंगोटी करून 35 पटसंख्या असलेली जि.प. शाळा 160 विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन पोहोचवली. गावातच विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी सर्वच गावकऱ्यांनी प्रयत्न देखील केले आहेत, तर दुसरीकडे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा, खोल्यामध्ये लिकेज आहेत, त्यामुळे पावसात गळती सुरू असते. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना याच बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करावा लागतो.
शिक्षक मिळावा म्हणून आंदोलन करताना विद्यार्थी आणि पालक (ETV Bharat Reporter) नाईलाजास्तव पंचायत समिती गाठली :आज एक वेगळा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा या गावातील विद्यार्थ्यांनी समोर आणला आहे. या विद्यार्थी आणि पालकांनी इंग्रजी विषयाला शिक्षक मिळावा म्हणून अनेकवेळा संबंधित कार्यालयांना भेट देऊन देखील आणि अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील इंग्रजी विषयाला शिक्षक उपलब्ध न करून दिल्याने विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समिती कार्यालय पाटोदा या ठिकाणी शाळा भरवली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाचा जाहीर निषेध देखील केला. "आमच्या वर्गाला इंग्रजी विषयाचा शिक्षक नाही. यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इंग्रजी हा विषय शिकवण्यामध्ये मागे राहात आहे. इतर विषयाचे शिक्षक असल्याने त्यांचा अभ्यासक्रम पुढे जात आहे. दीड महिना होऊन गेला तरीही आमच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आज शाळा सोडून तालुक्याच्या ठिकाणी आमची मागणी मागण्यासाठी यावं लागलं आहे." अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी तसंच पालकांनी दिली. इतरही काही प्रतिक्रिया पाहूयात...
आमची जिल्हा परिषदेची सौताडा येथील शाळा आहे. या ठिकाणी आम्ही मागणी करून देखील आम्हाला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळत नाही. त्यामुळे आम्हाला आज चक्क तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं आहे. - विद्यार्थिनी
आम्हाला इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळाला पाहिजे; कारण इतर विषयाचे शिक्षक आम्हाला त्यांचे विषय शिकवत आहेत. इंग्रजी हा विषय मागे पडत चालला आहे. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकवेळा मागणी करून देखील मुख्याध्यापकांनी आम्हाला शिक्षक उपलब्ध करून दिलेले नाहीत. मुख्याध्यापक सांगत आहेत की, मी मागणी केली आहे. मात्र शाळा भरून तब्बल दोन महिने होत आले असले तरीही अजूनही इंग्रजी विषयाला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. - विद्यार्थिनी
विद्यार्थी आणि पालक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आठवी, नववी आणि दहावी महत्त्वाचे वर्ग आहेत; मात्र याच वर्गाला इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. शासन या ठिकाणी असलेल्या शिक्षकांना लाखो रुपये पगार देतात. परंतु, शाळेवर हे शिक्षक आम्हाला मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थी हा भारताचं भवितव्य आहे आणि हेच भवितव्य जर अंधारात गेलं तर यांच्या आयुष्याचं काय होणार? सरकार सांगते आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा; मात्र या ठिकाणी शिक्षकच नसतील तर आम्ही पालकांनी करायचं काय? संबंधित विषयाला शिक्षक उपलब्ध होत नसल्याने आम्ही सरकारचा, प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा जाहीर निषेध करतो. आम्हाला जर तातडीने शिक्षक मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आम्ही या ठिकाणी शिक्षक घेऊन जाण्यासाठीच आलेलो आहोत. या ठिकाणी पालकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे. - पालकवर्ग
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सौताडा या शाळेला एकूण 15 शिक्षकांची मान्यता आहे. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. तर विद्यार्थी संख्या ही 440 असून 13 शिक्षक हे कार्यरत आहेत. दोन प्राथमिक पदवीधर पद हे रिक्त आहेत. आम्हाला मिळालेल्या पत्रानुसार, पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी केलेला तक्रारीनुसार आम्ही पंधरा दिवसातच इंग्रजी विषयाला शिक्षक उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन गटशिक्षणाधिकारी हनुमंत गव्हाणे यांनी दिलं आहे.
हेही वाचा:
- बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा गावकऱ्यांसह शिक्षकांनी केली पुन्हा सुरू, शाळेनं पटकवला प्रथम क्रमांक - Zilla Parishad School
- चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळा अंधारात; जिवती तालुक्यातील 37 शाळांचा समावेश
- National Teacher Award : यंदा एकाच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेला राष्ट्रीय पुरस्कार? मृणाल गांजाळे मानकरी