कोल्हापूर :'जगात भारी कोल्हापुरी' अशी कोल्हापूरची ओळख आहे. या जिल्ह्यात मुलखावेगळी माणसं गावागावात पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली हे गाव वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक कुटुंबात असलेल्या दुचाकी, चार चाकी, ट्रॅक्टर वाहनांचे फॅन्सी नंबर त्या घराची ओळख बनली आहे. अनेक घरांमध्ये तर गेल्या चार पिढ्यांपासून वाहनांना एकच नंबर आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर अर्ज करून हौस म्हणून येथील गावकऱ्यांनी प्रयाग चिखली गावाला 'फॅन्सी नंबरचं गाव' अशी नवी ओळख निर्माण करून दिली.
फॅन्सी नंबरचं वेड :कोल्हापूरची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या प्रयाग चिखली या गावाची लोकसंख्या 7 हजार 500 इतकी आहे. गावातील ग्रामस्थ प्रामुख्यानं शेती करतात. पंचगंगा नदीच्या काठावर सुपीक शेतजमीन ओलिताखाली असल्यानं येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीसह पशुपालन व्यवसायावर चालतो. मात्र, या गावाला गेली चार दशकं फॅन्सी नंबरचं वेड आहे.
फॅन्सी नंबरसाठी सर्वाधिक अर्ज : गावातील प्रत्येक घरात चार चाकी आणि दुचाकी घेताना कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे फॅन्सी नंबरसाठी सर्वाधिक अर्ज याच गावातून येतात. हा पारंपरिक हौसेचा वारसा नवी पिढीही पुढं नेत आहे. घरात नवीन येणाऱ्या वाहनाला कोणता फॅन्सी नंबर असावा याची चर्चा कुटुंबात होते. त्यानंतरच नव्या वाहनाला 92, 9596, 5353, 7777, 9695, 7500 यासह अनेक फॅन्सी नंबर घेतले जातात. गावात नवीन येणाऱ्या पाहुण्यांनाही आता याच नंबरवरुन घरांची ओळख तयार होऊ लागली आहे. देशभरातील नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी भारत सरकारनं आधार कार्ड नंबर सक्तीचे केले. मात्र, या गावानं वाहनांचे फॅन्सी नंबर प्राणपणानं जपून 'फॅन्सी नंबरचं गाव' अशी ओळख निर्माण केल्याची प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांनी दिली.