अमरावती Majhi Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता अमरावती येथील महिला व बालविकास भवनमध्ये विशेष 'मदत कक्ष' सुरू करण्यात आला आहे. सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मदत कक्ष येथे महिला फोन करून योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती विचारू शकतात. या मदत केंद्राद्वारे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांनी या योजनेसंदर्भात कुठलीही अडचण आल्यास बिनधास्त फोन करा, असं आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात दोन लाख 41 हजार महिलांची नोंदणी :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून त्याद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील एकूण दोन लाख 41 हजार बहिणींनी नोंदणी केली आहे. या योजनेकरिता ज्यांना कुठल्या अडचणी किंवा समस्या येत असेल त्यांच्यासाठी 8432520301 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली आहे.
असा आहे मदत कक्ष : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी 'मदत कक्ष' हा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सेवा देत असून सायंकाळी सहानंतर या केंद्रात दूरध्वनीद्वारे महिला संपर्क साधून आपल्या अडचणीचे निवारण करू शकतात.