महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मदात्या मुलानं बापाला एका क्षणात संपवलं, लोखंडी बत्त्यानं केले वार

मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार नातेवाइकांमध्ये केल्यानं वयोवृद्ध बापाला संपवल्याची धक्कादायक घटना दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी मुलाला अटक करण्यात आलीय.

SON MURDERED HIS FATHER IN AMRAVATI
पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

अमरावती : वृद्धापकाळात मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार नातेवाइकांमध्ये केल्यानं वयोवृद्ध बापाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संतापलेल्या मुलानं मंगळवारी (22 ऑक्टोबर) मध्यरात्री लोखंडी बत्त्यानं डोक्यावर अनेक वार करून हत्या केली. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भामोद येथे ही घटना घडली. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.

नेमकं प्रकरण काय? : रामकृष्ण सदाशिव कात्रे (वय - 60 वर्ष, रा. भामोद) असं मृतकाचं नाव आहे. तर अतुल रामकृष्ण कात्रे (40 वर्ष) हे आरोपी मुलाचं नाव आहे. हत्येच्या एक दिवसापूर्वी सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी दर्यापूर येथे दोघेही बाप-लेक बँकेत गेले होते. तेथील कामं आटपून भामोद येथे सोबतच ते परतले. मध्यरात्रीच्या सुमारास बाप-लेकात वाद झाला. माझ्याबद्दल नातेवाईकांना का सांगता असं म्हणत अतुलनं रामकृष्ण यांच्यावर बत्त्यानं डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेलं रामकृष्ण कात्रे जागीच ठार झालेत. यावेळी घरात आरोपी अतुलची पत्नी व मुलगी असे चौघेच होते.

पोलिसांची घटनास्थळी धाव :मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास माहिती मिळताच, येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रामकृष्ण कात्रे हे घरात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. आरोपी अतुल कात्रे हादेखील घटनास्थळी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, ठाणेदार विवेक देशमुख, सहायक उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलिस कर्मचारी पंकज नळकांडे, शरद सारसे, अनिल भटकर, प्रवीण वानखडे, अमोल केंद्रे, धनंजय डोंगरे, रोशन टवलारे, मुकेश मालोकार, सुनीता चव्हाण, जयश्री लांजेवार यांनी पंचनामा केला.

आरोपी मुलाला अटक :कात्रे कुटुंबात 24 एकर शेती आहे. मृत रामकृष्ण कात्रे यांच्या पश्चात तीन विवाहित मुली व अतुल हा मुलगा आहे. मुलगा व्यवस्थित सांभाळ करीत नसल्याचं नातेवाइकांमध्ये ते वारंवार सांगत होते. त्याचा राग अतुलच्या मनात होता. त्या रागात त्यानं लोखंडी बत्त्यानं वार करून हत्या रामकृष्ण यांची हत्या केली. त्याची कबुली अतुलनं पोलिसांना जबाबात दिली. त्यावरून त्याला अटक करून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती येवद्याचे पोलीस निरीक्षक विवेक देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

  1. दहावी पास होणं सोप्पं! गणित, विज्ञान विषयांमध्ये 20 गुण मिळाले तरी पास; शिक्षणतज्ञांनी व्यक्त केली नाराजी
  2. सचिन वाजेला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार
  3. लॉरेन्स बिश्नोई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? 'या' पक्षानं दिली ऑफर; भगतसिंग यांच्याशी केली तुलना

ABOUT THE AUTHOR

...view details