सोलापूर Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Accident : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कोलकाता येथील एका छायाचित्रकार भाविकाचा मृत्यू झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात छायाचित्रण करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील कल्याण चट्टोपाध्याय ( वय ४८ ) हे पंढरपूर येथे आले होते. पुरंदावडे येथे रिंगण सोहळ्याचे छायाचित्रण करीत असताना हा अपघात झाला. स्वाराचा आणि माउलीचा अश्व धावत असताना स्वाराच्या अश्वाचा मागील उजवा पाय माउलीच्या अश्वाच्या लगाममध्ये अडकल्याने तो धावत असताना अडखळला आणि रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या भाविकांच्या अंगावर पडला. त्यामध्ये दोघे जखमी झाले. कल्याण चट्टोपाध्याय हे मिताली अपार्टमेंट, मोंडल पारा रोड,नॉर्थ 24,पर्गानास, बारानगर, कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथील रहिवासी होते. रिंगण सोहळ्यातील धावता अश्व कल्याण चटोपाध्याय हे फोटो काढत असताना अंगावर पडला. अकलुज पोलीस ठाण्यामधे मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आशुतोष अप्पासाहेब कोळी (रा.जयसिंगपुर, जि.कोल्हापुर) यांनी ही माहिती दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत विहंगम दृष्य कॅमेरात कैद करताना मृत्यू: पोलिस निरिक्षक भानुदास निंभोरे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, माऊलीच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण सोहळा सुरू होता. कल्याण चटोपाध्याय रिंगण सोहळ्यातील विहंगम दृश्य कॅमेरात कैद करत होते. रिंगण सोहळ्यात धावताना अश्व अंगावर पडल्यानं कल्याण चटोपाध्याय यांना चक्कर आली आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर अकलुज येथे उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं स्पष्ठ केलं. याबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी सदरची दु:खदायक घटना असल्याचे सांगीतलं. घटनेचं चित्रीकरण पाहिल्यास मागच्या अश्वाचा अंगभाग हा कल्याण चटोपाध्याय यांच्या अंगावर पडल्याचं दिसत आहे.