ठाणे : ठाणे-कल्याण पश्चिम भागातील वेद आर्ट अकॅडमीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त वेद अकादमीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटली आहे. खडकपाडा येथील कला शिक्षक यश महाजन, आणि भावना महाजन यांनी ही रांगोळी काढून महाराजांना मनाचा मुजरा केला आहे.
४० चौरस फूट आकारात रेखाटली रांगोळी : यश महाजन यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची ५×८ एकूण ४० चौरस फूट आकारात सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटायला त्यांना तब्बल चार ते पाच तास वेळ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी न चुकता रांगोळी, चित्र, विविध उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन राबवत असतो असं यश महाजन यांनी सांगितलं.
अनेक महापुरुषांच्या काढल्या रांगोळ्या : कला शिक्षक महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवाशी असून ते शिक्षक म्हणून कल्याणला स्थायिक आहेत. महाजन यांनी आतापर्यंत महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. कलाम, सावित्रीबाई फुले, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहोलीसह इतर प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अनेक महापुरुषांच्या रांगोळ्या काढल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटण्यासाठी ६ किलो विविध रंगाच्या रांगोळ्या लागल्याची माहिती, महाजन यांनी दिली.
35 टन रांगोळीतून छत्रपती शिवरायांची प्रतिमा : या आधीही कोल्हापुरातील वारणा समूहाकडून राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे सैनिक स्कूलच्या मैदानावर 11 एकर जागेवर 35 टन रांगोळीतून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली होती. या उपक्रमात ताराराणी ब्रिगेडच्या 325 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा -