सोलापूर: अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाल्यानं सोलापूर हादरलं आहे. इरण्णा बसवलिंगप्पा मठपती (23 वर्ष,रा.गुरुदेव दत्त नगर,जुळे सोलापूर), निखिल मारुती कोळी(वय 23 वर्ष,रा,अक्षय सोसायटी,जुळे सोलापूर), दिगविजय श्रीधर सोमवंशी (वय वर्ष,21,रा अक्षय सोसायटी,जुळे सोलापूर) अशी तिघे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तिघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर :दुचाकीचा अपघात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला आहे. तिघे रात्री पार्टी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, तिघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत भर चौकात पडले होते. मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस मृतदेह पडले. तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती प्राप्त होताच नातेवाईकांनी सोमवारी सकाळपासून शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली आहे.
निखिल कोळी याने मित्रांना पार्टी दिली होती : निखिल कोळी याचा मंडप डेकोरेशन व्यवसाय आहे. रविवारी निखिलनं एका कार्यक्रमाकरिता मंडप व्यवस्था करून दिली होती. निखिलला रविवारी एका कार्यक्रमामधून मंडपचे भाडे आले होते. निखिलनं दोन्ही जवळच्या मित्रांना रविवारी रात्री पार्टीचे आमंत्रण दिले होते. इरण्णा मठपती, दिग्विजय सोमवंशी, निखिल कोळी या तिघांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली. पार्टी करून पल्सर या दुचाकी वाहनावरून ट्रिपल सीट घरी परत जाताना महावीर चौकात दुचाकी डीवायडर आणि फूटपाथला जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की तिघे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आदळले. तिघांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. रक्तबंबाळ होऊन निखिल, दिग्विजय, इरण्णा जाग्यावरच ठार झाले. निखिल कोळीनं दिलेली पार्टी अखेरची ठरली.
मृतांच्या नातेवाईकांचा सिव्हिल रुग्णालयात आक्रोश :निखिल कोळी आणि इरण्णा मठपती हे घरात एकुलते एक होते. इरण्णा हा दुचाकी शोरूममध्ये नोकरीस होता. तर दिग्विजय सोमवंशी याचा कटिंग दुकानाचा व्यवसाय होता. तिघांवर कुटुंबाची जबाबदारी होती. मात्र एका पार्टीमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल झाल्यानंतर सोमवारी 29 जानेवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. नातेवाईकांचा व मित्र मंडळीचा प्रचंड आक्रोश शासकीय रुग्णालयात पाहावयास मिळाला.
हेही वाचा-
- हरियाणात भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं, 4 वेटरचा जागीच मृत्यू; सीसीटीव्ही पाहून येईल अंगावर काटा