अमरावती - पर्यावरण संतुलनामध्ये पक्ष्यांचं स्थलांतरण हे अतिशय महत्त्वाचं असते. हिवाळ्यात विदेशातील पक्षी महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक पानवठ्यांवर आलेली दिसतात. जवळपास 60 ते 70 प्रजातींमधील नवे पक्षी हिवाळ्यात तलाव आणि नद्यांच्या परिसरात ( migratory birds visit in Amravati ) पक्षी मित्रांचं लक्ष वेधून घेतात.
विदेशातून आलेत हे पक्षी - सध्या अमरावती शहर आणि जिल्ह्यात असणाऱ्या पानवठ्यांवर मोठ्या संख्येनं कॉमन पोचार्ड, कॉकटेल पोचार्ड , विविध प्रजातींचे बदकं, हंस, व्हाईट स्टार्क, ग्रेटर स्कुप, , मलार्ड , लांब पाय असणारा चिखलपक्षी असे पानपक्षी आणि रानपक्षी दिसत आहेत. शहरालगतच्या वडाळी आणि छत्री तलावात बदकांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात, असं पक्षी निरीक्षक यादव तरटे पाटील यांनी सांगितलं.
या भागातून आलेत पक्षी - आपल्या परिसरात युरोप, मध्य आशिया, मंगोलिया, युरेशिया या भागातून हे पक्षी आले आहेत. यापैकी वाईट स्टार्क हे युरोपमधून आलेत. तर मलार्ड हे पक्षी रशिया, कजाकिस्तान, मंगोलिया आणि सायबेरिया या देशांमधून आलेत. ग्रेटर स्कूप हा पक्षीदेखील रशिया आणि कझाकिस्तानमधून आला, असं यादव तरटे पाटील यांनी सांगितलं. निसर्गचक्रामध्ये पक्षी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी माहिती पक्षी निरीक्षक यादव तरटे पाटील यांनी दिली.
पक्षी मित्रांमध्ये आनंद - नेमका पक्षी कोणता, कुठून आला आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, याची अचूक माहिती घेणं पक्षी मित्रांसाठी आनंदाची बाब मानली जाते. सध्या विदेशातून आलेल्या पक्षांचं निरीक्षण करण्यासाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. अमरावती शहरालगत वडाळी तलाव, फुटका तलाव, छत्री तलाव यासह मालखेड तलाव या परिसरात मोठी दुर्बीण आणि कॅमेरा घेऊन पक्षी मित्र दिवस उजाडताच फिरताना दिसतात. " मेळघाटच्या जंगलात असणारे पानवठेदेखील पक्षी निरीक्षणासाठी शांत आणि योग्य ठिकाण मानलं जातं. सुट्टीच्या दिवशी तर लहान मुलांना घेऊन अनेक पक्षी मित्र जंगल परिसरात असणाऱ्या पानवठ्यालगत अगदी ठिय्या मांडून बसलेले दिसतात", असं यादव तरटे पाटील यांनी म्हटलं.
विदेशी पक्षांचा मार्चपर्यंत मुक्काम- संपूर्ण भारतात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात विदेशातील पक्षी अन्न शोधण्यासाठी स्थलांतरकरून येतात. अनेक काळांपासून या पक्ष्यांना नेमकं कुठं मुक्कामी जायचं, हे माहीत असतं. आपल्याला हवं असणार मुबलक अन्न आणि राहण्यासाठी योग्य वातावरण असलेल्या भागात पक्षी पोहोचतात, अमरावती जिल्ह्यात पानवठ्याच्या परिसरात सुमारे 60 ते 70 प्रजातींचे विदेशी पक्षी वास्तव्याला येतात. नोव्हेंबर, डिसेंबर ,जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत या पक्षांचा मुक्काम अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील पानवठ्यांवर असतो. मार्च महिन्यात आपल्या भागात उन्हाळा सुरू होताच हे सर्व विदेशी पक्षी पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परततात. ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशी पक्षी स्थलांतारणाबाबतची माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली.
खरंतर आपला जीव वाचवण्यासाठी विदेशातील पक्षी आपल्या भागात येतात. त्यांच्याच मुळावर आपण उठलो की काय? असा प्रश्न पक्षी मित्र म्हणून भेडसावतोय - पक्षी निरीक्षक, यादव तरटे पाटील
विदेशातून येणाऱ्या पक्षांच्या संख्येत घट- सध्या, आपल्या परिसरात विदेशातून आलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची पक्षी मित्रांना छानशी पर्वणी लाभली आहे. असे असले तरी गेल्या दहा वर्षांचा अभ्यास केला असता विदेशातून येणाऱ्या पक्षांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर येते. बर्ड लाईफ इंटरनॅशनलच्या अहवालानुसार पक्षांच्या प्रजाती घटत असल्यासंदर्भातला धक्कादायक अहवाल समोर आला असल्याचं यादव तरटे पाटील यांनी सांगितलं.
- पक्ष्यांचं स्थलांतर कमी होण्याची काय आहेत कारणं?विदेशातून भारतात स्थलांतर होणाऱ्या पक्ष्यांचे कमी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. पाण्यामध्ये वाढलेलं प्रदूषण हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे. जलीय परिसंस्थांचं अस्तित्वदेखील धोक्यात येत आहे. अनेक नदी आणि तलावांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. अनेक तलावांमध्ये विकास प्रकल्पांचा विळखा हे पक्षांच्या अस्तित्वासाठी अडचणीचं ठरतंय.