मुंबई- अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरी करण्याचा अज्ञात व्यक्तीकडून प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरानं सैफ अली खानवर ( Actor Saif Ali Khan) चाकूनं हल्ला केला आहे. मध्यरात्री दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बॉलीवूडमधील 'नवाब' अशी ओळख असलेल्या अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आला आहे. अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील घरात एका अज्ञात व्यक्तीनं चोरी करण्यासाठी घुसखोरी केली होती. याबाबतचा मुंबई पोलीस अधिकचा तपास करत असल्याचे माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरात आवाज झाल्यानं घरातील कर्मचाऱ्यांना त्याची चाहूल लागली. घरातील नोकरवर्गानं आरडाओरड केल्यानं बेडरूममध्ये झोपलेल्या सैफ अली खानला जाग आली. तो बाहेर आला. त्यानंतर चोरी करण्यासाठी आलेला अज्ञात व्यक्ती आणि अभिनेता सैफ अली खान यांच्यात झटापट झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. या झटापटीत अज्ञात इसमानं आपल्या जवळील चाकू बाहेर काढला. अभिनेता सैफ अली खानवर वार केले. यात अभिनेता सैफ अली खान जखमी झाला आहे.
धावपळीचा फायदा घेत चोरट्यानं काढला पळ-या चाकू हल्ल्यात सैफ जखमी झाल्यानं त्याच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी धावपळ सुरू केली. याच धावपळीच्या फायदा घेत चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यानं पळ काढला. अभिनेता सैफ अली खान मुंबईतील वांद्रे भागात राहतो. याच भागात मागील वर्षी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर आता सैफ अली खानवर थेट चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे.
करीना कपूर आणि मुले सुरक्षित- अभिनेत्याच्या टीमनं अधिकृत निवदेनात म्हटलं, "सैफ अली खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना संयम ठेवण्याचं आवाहन करतो." सूत्राच्या माहितीनुसार सैफनं त्याच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी निशस्त्र असताना चोराशी लढा दिला. त्यानं कुटुंबाला इजा होण्यापासून वाचवलं. त्या अज्ञात व्यक्तीकडं शस्त्र होते. सैफकडे काहीही नव्हते. दरोड्याच्या वेळी चोरानं चाकूनं सैफच्या पाठीवर वार केले. पोलिसांकडून घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. सुदैवानं सैफची पत्नी तथा अभिनेत्री करीना कपूर खान, त्यांची मुले तैमू आणि जेह सुरक्षित आहेत.
'परंपरा' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पर्दापण-सैफ हा अभिनेत्री शर्मिला टागोर आणि माजी क्रिकटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा आहे. सैफ अली खाननं 1993 मध्ये 'परंपरा' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, कच्चे धागे, हम साथ-साथ है, दिल चाहता है, कल हो ना हो, हम तुम, परिणीता, सलाम नमस्ते, आणि तान्हाजी या चित्रपटांमध्ये अभिनेता सैफनं प्रमुख भूमिका केल्या आहेत. अलीकडच्या काळात सैफ हा जान्हवी कपूर आणि एनटीआर ज्युनियर यांच्यासोबत 'देवरा: पार्ट 1' मध्ये झळकला होता.
सैफची प्रकृती कशी (Saif Ali Khan health updates) आहे? हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या शरीरावर सहा वार झाल्याचं सांगितलं. त्यापैकी दोन जखमा खूप खोलवर मणक्याजवळ आहेत. लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी म्हणाले, " सैफला पहाटे ३:३० वाजता रुग्णालयात आणण्यात आलं. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे".
- मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं. तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-