पालघर Child Pornography : 18 वर्षांच्या आतील मुला-मुलींचे अश्लील फोटो, व्हिडिओ समाज माध्यमावर टाकणे हा कायद्यानं गुन्हा आहे. या गुन्ह्यावर नजर ठेवण्यासाठी देशभर सायबर पोलिसांचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम रेकार्ड ब्यूरो’ची नजर सर्व समाज माध्यमावर असून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’पासून सावध राहा, असा संदेश जणू वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना मिळालेल्या माहितीतून मिळतोय. माहिती तंत्रज्ञान कायदा 67 ब नुसार लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपच्या माध्यमातून शेअर करणं हा गुन्हा आहे. कुठल्याही समाज माध्यमावर अशा प्रकारचे व्हिडिओ, प्रतिमा शेअर केली, तर त्यावर ‘नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ चं लक्ष असतं. ज्या भागातून किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ शेअर केले, त्या राज्यांना ‘नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ ॲलर्ट करत असते.
चाईल्ड पोर्नोग्राफीच्या माहितीवरुन शोध : संबंधित राज्यातील ‘सायबर क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ त्याची माहिती संबंधित जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांना कळवत असते. प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे कार्यरत असते. या पोलीस ठाण्याकडे संबंधित जिल्ह्याचे पोलीस प्रमुख केंद्रीय राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी विभागाकडून आलेली माहिती पाठवत असतात. माहिती तंत्रज्ञान कायद्याचा आधार घेऊन कुठल्या भागातून आणि कुठल्या संपर्क क्रमांकावरुन असे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ शेअर झाले, त्याचा शोध काम संबंधित जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाणे घेत असतात.