महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : कैसर खालीद आणि रवींद्र शिसवे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ? - Ghatkopar Hoarding Collapse Case

Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत तब्बल 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रेल्वे विभागाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता एसआयटीच्या रडावर तत्कालीन पोलीस आयुक्त आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

Ghatkopar Hoarding Collapse Case
कैसर खालिद (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 2:05 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं (SIT) रेल्वेच्या आजी-माजी पोलीस आयुक्तांचे जबाब नोंदवले. यात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी अर्षद खान याला ओळखत असल्याचं स्पष्ट केलं. वेल्फेअर फंड वाढवण्यासाठी होर्डिंगना परवानगी देण्यात आल्याचा दावा कैसर खालिद यांनी यावेळी केला. कैसर खालिद यांचा जबाब एसआयटीनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केला आहे. मात्र, याप्रकरणात कैसर खालीद आणि रवींद्र शिसवे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. या प्रकरणात लवकरच अर्षद खानला पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू :घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये बेकायदेशीर परवानग्या घेऊन उभारलेलं भलं मोठं होर्डिंग 13 मे रोजी पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत 17 नागरिकांचा जीव गेला आहे. या दुर्घटनेत 80 हून अधिक जण जखमी झाले. याप्रकरणी तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं आरोपी भावेश भिंडे, मनोज संगू, जान्हवी मराठे-सोनलकर आणि सागर कुंभारे उर्फ सागर पाटील यांना अटक करत त्यांच्याविरोधात शुक्रवारी न्यायालयात 3 हजार 299 पानांचं आरोपपत्र दाखल केलं.

वेल्फेअर फंड वाढवण्यासाठी होर्डिंगना परवानगी :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसह जखमी व्यक्तींचा जबाब नोंदवला आहे. त्यासह महापालिका आणि मुंबई रेल्वे पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी अशा 102 साक्षीदारांच्या जबाबांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला. गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी मुंबई रेल्वे पोलीसचे तत्कालीन आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब नोंदवला. कैसर खालिद यांनी गुन्हे शाखेकडं नोंदवलेल्या जबाबात वेल्फेअर फंड वाढवण्यासाठी होर्डिंगना परवानगी देण्यात आल्याचा दावा केला. तसेच त्यांनी अर्षद खानला ओळखत असल्याचं जबाबात नमूद केलं.

आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना क्लिनचिट :मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या आधी इगो मीडिया प्रा. लि. कंपनीला ई टेंडरींग प्रक्रियेतून तीन होर्डिंग्ज उभारण्यासाठी परवानगी मिळाली होती. तीन होर्डिंग्जबाबत माजी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यांचा या प्रकरणात सहभाग आढळून आला नसल्यानं त्यांना याप्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

संशयित आरोपींचे मोबाईल जप्त :गुन्हे शाखेचे अधिकारी याप्रकरणात पैशांच्या व्यवहारांबाबत अधिक तपास करत आहेत. संशयित असलेल्या अर्षद खान याच्याकडं अधिक चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणात अटक आणि संशयित आरोपींचे मोबाईल गुन्हे शाखेनं जप्त केले. त्यावर डिलीट करण्यात आलेला मेसेज आदी डेटा पुन्हा मिळवून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (FSL) पाठवण्यात आले आहेत. याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कैसर खालिद यांच्यावर कारवाईची टांगती तलवार : गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात घाटकोपर होर्डिंग व्यतिरिक्त इतर तीन होर्डिंग्जना कायदेशीर परवानगी देण्यात आली. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या आधी इगो मीडिया प्रा. लि. कंपनीला ई टेंडरींग प्रक्रियेतून तीन होर्डिंग उभारण्यासाठी परवानग्या मिळाल्या होत्या. माजी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कार्यवाही करण्यात आली असल्यानं त्यांना याप्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल - Ghatkopar Hoarding Accident
  2. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित - Ghatkopar hoarding incident case

ABOUT THE AUTHOR

...view details