कोल्हापूर Kolhapur Bet Dwarka Story :दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या करवीर नगरीत 12 व्या शतकाच्या सुमारास श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याचा उल्लेख 'करवीर महात्म्य' या ग्रंथात आढळतो. कोल्हापुरातील हुतात्मा पार्क येथील जयंती आणि गोमती जयंती या दोन नद्यांच्या तीरावर श्रीकृष्णानं आपली द्वारका वसवली होती. आजही येथे श्रीकृष्ण आणि शंभू महादेव यांच्या एकत्रित दर्शनाचा संगम असलेलं लिंगेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणाचा उल्लेख 'बेट द्वारका' म्हणून केला जातो.
'बेट द्वारका'ची पौराणिक कहानी (Source - ETV Bharat Reporter) करवीरचा पौराणिक संदर्भ सांगणाऱ्या करवीर महात्म्यातील कथेनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या सोळा पत्नींसह शापमुक्त होण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यांना शाप मुक्त करण्यासाठी स्वतः महादेव लिंगेश्वर महादेव म्हणून प्रकट झाल्याचा उल्लेख या पौराणिक ग्रंथात आढळतो. भगवान श्रीकृष्णाची राजधानी असणाऱ्या द्वारकानगरीला साधर्म्य साधणारी 'बेट द्वारका' करवीर नगरीत वसवल्याचा संदर्भही या ग्रंथात आढळतो, अशी माहिती मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
मंदिर मूळ रूपात आणण्यासाठी प्रयत्न : "अत्यंत प्राचीन अशा स्वरूपात असलेल्या या लिंगेश्वर महादेव मंदिराची रचना थरावर थर अशी आहे. मंदिर प्राचीन काळातील असल्यानं मंदिराची दुरावस्था झाली असून कोल्हापुरातील उद्योग नगर भागातील जय शिवराय मित्रमंडळाच्या माध्यमातून मंदिर मूळ स्वरूपात आणण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या मंदिरामध्ये काही प्राचीन वीरगळ आढळतात. मंदिर मूळ रूपात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असे मंडळाचे सदस्य पांडुरंग पाटील यांनी सांगितलं. द्वारकेत जशी भगवान श्रीकृष्णाच्या भाविकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यानं या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अशी आहे मूर्तीची रचना :महादेव लिंगेश्वर मंदिरात श्रीकृष्णाची छोटी चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही हाताखाली गोमाता आणि श्रींची पत्नी विराजमान आहे. त्याचबरोबर समोर लिंगेश्वर महादेवाची पिंड असून या मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी येतात. जयंती आणि गोमती या नद्यांच्या तीरावर वसलेल्या या छोट्या मंदिराची महती आहे तर करवीर नगरीतील भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वर्गतरंगीनी, पयोवहा, पापहरा आणि पयोष्णी या आठ नावांचा उच्चार करून पंचवंगीत स्नान केल्यास त्या नरास कधीही नरकाची भीती नाही, असा उल्लेख आढळतो. यामुळे कोल्हापुरातील या प्राचीन महादेव लिंगेश्वर मंदिराचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
हेही वाचा
- कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami
- गोविंदा आला रे... आला..., 'या' आहेत मुंबईच्या प्रसिद्ध दहीहंड्या - Dahi Handi 2024
- उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic