कोल्हापूर Shravan Somvar Ambabai Temple : तब्बल 71 वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्याचा पवित्र योग यंदा जुळून आलाय. या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील अंबाबाईच्या गाभाऱ्यावर असलेलं पौराणिक मातृलिंग मंदिर दर्शनासाठी आज भाविकांना खुलं करण्यात आलं. आई अंबाबाईच्या मंदिरातील मातृलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या मातृलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत असल्यानं वर्षातून महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. यामुळं या ठिकाणी भाविक मोठी गर्दी करतात.
मंदिराचा इतिहास :साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं अंबाबाई मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात हिंदू देवदैवतांची अनेक मंदिरं आहेत. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या गाभाऱ्यावर मातृ शिवलिंग मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून महाशिवरात्री आणि प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिर खुलं करण्यात येतं. तसंच यंदा पहिल्यांदाच श्रावणाची सुरुवात सोमवारी होत असल्याचा दुर्मीळ योगायोग जुळून आला असल्यानं या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. तसंच महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरात प्रदक्षिणा घालताना भाविकांना अर्धी प्रदक्षिणा करता येते. मात्र, अंबाबाई मंदिरातील मातृ शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत असल्यानं या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.