मुंबई Worli Hit and Run Case : रविवारी घडलेल्या वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर त्याच दिवशी नाखवा कुटुंबाची आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा एकदा पीडित कुटुंबाची आमदार आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार, गृहखातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मिहिर शाह राक्षसी वृत्तीचा : या भेटीनंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मिहिर शाहानं मर्डरच केला आहे. त्यामुळं आरोपी मिहिर शाहला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाखवा कुटुंबाची आज आम्ही भेट घेतली. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे त्यांच्याकडं बघून दिसत आहे. म्हणून या मुंबईत, महाराष्ट्रात एवढी भयानक घटना घडलेली आहे. नरकातून राक्षस जरी आला तरी एवढं भयानक कृत्य करणार नाही, तेवढं भयानक कृत्य मिहिर शाह याच्याकडून झालेलं आहे." तसंच अपघातानंतर मिहिर थांबला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता, पण त्यानं ज्या पद्धतीनं त्या महिलेला फरफटत नेलं. ते अतिशय संतापजनक आहे. या कुटुंबाला मदत आर्थिक मदत वगैरे काही नको. पण आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. मिहिर हा राक्षसी वृत्तीचा आहे. त्याला राक्षसच म्हणावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.