मुंबईLok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह विविध ठिकाणी मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत या जागांवरील उमेदवारांबाबत तिढा कायम होता. अखेरीस या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून शिवसेना शिंदे गटाला या जागा मिळाल्या. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर, उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. ठाण्याची जागा शिवसेनेकडं राखण्यात शिंदे गटाला यश आलं असलं, तरी या जागेवरून त्यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला मदत? :शिवसेना शिंदे गटाकडून बऱ्याच प्रतीक्षेनंतर उमेदवार जाहीर करण्यात आले. अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजपाची मते अधिक आहेत. तसंच काँग्रेसचीही ताकद या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. मात्र, असं असताना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याबाबत सध्या मतदारसंघात चांगलं मत दिसत नाही. त्यांच्याकडं असलेले अनेक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच राहिल्यानं त्या निवडून येण्याची शक्यता नाही, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केलं. तर, उत्तर पश्चिम मतदारसंघातही रवींद्र वायकरांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं अमोल कीर्तिकर यांचा मार्ग अधिक सोपा करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये नरेश मस्के यांच्याबाबत शिवसेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांना उमेदवारी देणे म्हणजे राजन विचारे यांना निवडून येण्यास मदत करणे, अशीच परिस्थिती असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.