मुंबई Shiv Sena MP At Shivaji Park : लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानं महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार खासदार फुटू नयेत, याची खबरदारी घेण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नवनिर्वाचित खासदारांनी गुरुवारी शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदार खासदारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात न राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवनिर्वाचित खासदारांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन :शिवाजी पार्क इथं खासदार श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, संदिपान भुमरे आदी खासदारांनी उपस्थिती लावत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. या खासदारांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं. दरम्यान, "इथं आल्यानंतर नेहमीच ऊर्जा मिळते. बाळासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर नेहमीच एक उत्साह येतो. नवीन ऊर्जा येते," असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच "खासदार म्हणून आम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे इथं सर्व खासदार येऊन आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. त्यांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले," असं माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले.