मुंबईBJP killing allies :राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. मात्र महायुती तसंच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद सुरू आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी तसंच महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. महायुतीतील मित्रपक्षांत भाजपाबद्दल नाराजी पाहायला मिळत मिळत आहे. त्यामुळं भाजपा मित्रपक्षांना संपवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपाकडून मित्रपक्षांना संपविण्याचं काम केलं जातंय का, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
भाजपा मित्रपक्षांना संपवतोय :शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेश नवले यांनी मंगळवारी भाजपावर थेट निशाणा साधला. भाजपाला जे लोक नको आहेत, त्यांना बदलण्याचा आग्रह त्यांच्याकडून केला जात आहे. याकरता वारंवार सर्व्हेचं कारण दिलं जात आहे. सर्व्हेतचा रिपोर्ट विरोधात आला असून उमेदवार बदलण्याची भाजपाची रणनीती चुकीची आहे. भाजपाकडून मित्रपक्षांना संपविण्याचं काम केलं जातंय. सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवलं जात असून आम्ही झुकणार नाही, असा इशारा सुरेश नवले यांनी भाजपाला दिला आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या चर्चा महायुतीसाठी घातक असल्याचंही ते म्हणाले.
भाजपाकडून गळचेपी :महायुतीतील जागा वाटपाचा वाद आता उघडपणे समोर येतं आहे. हे पहिल्यांदा घडतं नाही. युतीचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी देखील भाजपाकडून गळचेपी होत असल्यामुळं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडं राजीनामा दिला होता. त्यावेळी अनेक शिवसेना मंत्री राजीनामा देण्याची भाषा करत होते. आता देखील शिवसेना पक्षात दोन गट पडल्यानंतर शिंदे शिवसेना भाजपासोबत सत्तेत आहे. आता देखील जागा वाटपात भाजपाचा वरचष्मा दिसत आहे. भाजपा मित्र पक्ष संपवण्याचं काम करत असल्याचं नवले यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महायुतीत सगळंच काही अलबेल नसल्याचं चित्र सध्या दिसतंय. त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता असून विरोधकांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.