मुंबई Shiv Sena Foundation Day 2024:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या सुचनेनुसार 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. गेल्या 58 वर्षांत शिवसेनेत अनेक स्थित्यंतरं झाली. यात महत्वाचं म्हणजे डाव्यांना संपवण्यापासून डाव्यांसोबत शिवसेनेचा झालेला प्रवास स्वागतार्ह असल्याचं डाव्या चळवळीचे नेते विश्वास उटगी यांनी म्हटलंय. शिवसेनेनं 1970 मध्ये आमदार कॉ. कृष्णा देसाई यांचा खून करून कॉंग्रेसला मदत केल्याचा आरोप आहे. तसंच त्यांनी डाव्यांना संपवण्याचा काम केलं असं म्हटलं जातं. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक निवडून आले.
विधानसभेत शिवसेनेचा पराभव : 1978 मध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्या आणीबाणीला बाळासाहेबांनी अघोषित समर्थन दिलं होतं. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. केंद्रात इंदिरा गांधी यांचा, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव झाला होता. यातच 1973 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 40 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, विधानसभेत झालेली वाताहत लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक हरलो, तर शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन, असं जाहीर करत राग व्यक्त केला होता. 1978 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्या. परिणामी महापालिकेतील सत्ता गेली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांची मनधरणी केली. काहींनी तर तुम्ही राजीनामा दिला, तर आमच्या प्रेतावरून जावं लागेल, असा पवित्रा घेतला. मात्र बाळासाहेब ठाम होते. त्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेतील भगवा कधीच खाली पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली. तेव्हाच बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागं घेतला.
1985 पासून पालिकेत सत्ता : 1985 साली झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसैनिकांनी पाळला. 1985 साली शिवसेनेचे महापौर म्हणून छगन भुजबळ विराजमान झाले. त्यानंतर दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर ,किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेची महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवली. 1992 ते 1996 या चार वर्षांचा अपवाद वगळता मुंबईचं महापौरपद शिवसेनेनं राखलं.