हैदराबाद- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्यांकरिता दिलासादायक बातमी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून कमी करण्यात आले आहेत.
सरकारी तेल आणि गॅस कंपनीकडून गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या १ तारखेला जाहीर होतात. त्यानुसार आज दर जाहीर करण्यात आलेले आहेत. सरकारी कंपनीनं व्यावसायिक सिलिंडरच्या किमती ७ रुपयांनी कमी केले आहेत. कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' राहणार आहेत.
असे आहेत नवीन दर- दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १८०४ रुपयांवरून १७९७ रुपये झाली आहे. मुंबईत १७५६ रुपयांवरून १७४९.५० रुपये द्यावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत १९११ रुपयांवरून १९०७ रुपये असणार आहे. तर चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत १९६६ रुपयांवरून १९५९.५० रुपयांवर झाली आहे.
- जानेवारीमध्येही दर झाले होते कमी- यापूर्वी, सरकारी तेल आणि गॅस कंपन्यांनी जानेवारीमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. हे दर १४ ते १६ रुपयांनी कमी केले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढविले होते.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर- सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे १ ऑगस्ट २०२४ च्या दराप्रमाणं घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना विकत घेता येणार आहे.