पुणे Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली. आमचं सरकार सर्वसमावेशक असून उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत : एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत. संपूर्ण जगात शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमी ज्या-ज्या देशात आहेत, तेथे ते शिवजयंती सोहळा साजरा करतात." मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, "शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम, धैर्य, शौर्य, त्याग, दुरदृष्टी, सर्वव्यापी हिंदूत्व याचं प्रतिक आहेत. त्यांची सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे युगप्रवर्तक, सर्वोत्तम प्रशासक, रयतेचा राजा अशी अनेक रुपं पाहिली. ते जितके धार्मिक होते, तितकेच ते आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते."