महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी महोत्‍सवाची संस्थानच्या वतीने जय्यत तयारी; 31 डिसेंबरला रात्रभर साई मंदिर राहणार दर्शनासाठी खुलं - SHIRDI MAHOTSAVA PREPARATIONS

29 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 अखेर 4 दिवस सांस्‍कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील साई संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या बाळासाहेब कोळेकरांनी दिलीय.

Shirdi Sai Sansthan
शिर्डी साई संस्थान (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2024, 2:01 PM IST

Updated : Dec 25, 2024, 4:07 PM IST

शिर्डी - 2024 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येणार असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31 डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिलीय. चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्त शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत चार दिवसीय शिर्डी महोत्‍सव साजरा करण्यात येणार असून, या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलीय. 29 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 अखेर 4 दिवस विविध सांस्‍कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील साई संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिलीय.

90 पायी पालख्या येणार :नवीन वर्षानिमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच शिर्डी महोत्‍सवाकरिता राज्यासह देशातील अनेक भागातून 90 पायी पालख्या येणार असल्याची नोंदणी भाविकांनी केलेली आहे. येणाऱ्या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साई धर्मशाळा आणि भक्‍त निवासस्‍थान या ठिकाणी 34 हजार 500 चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.

मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे तयार :या महोत्सवाकाळात साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता सुमारे 120 क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकिटे आणि सुमारे 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे तयार करण्‍यात आली आहेत. तसेच उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी नवीन दर्शन रांग, श्रीसाईनाथ मंगल कार्यालय, द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर 4 चे आतील बाजू, श्रीसाईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आले आहेत.

एक हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत :या कालावधीत भक्‍तांच्‍या सोयीसाठी नवीन दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम आणि श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून, तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नवीन भक्‍तनिवासस्‍थान, धर्मशाळा आणि श्रीसाईप्रसादालय येथे रुग्‍णवाहिका तैनात ठेवण्‍यात येणार आहेत. तसेच सुरक्षाकर्मी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून, बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्‍यात येऊन, याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे पोलीस निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी असे एकूण एक हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी : मंगळवार 31 डिसेंबर 2024 या दिवशी साई समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार असल्‍यामुळे रात्री 10 वाजता साईंची होणारी शेजारती आणि 1 जानेवारी रोजी पहाटेची 5.15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही, असेही साईबाबा संस्थानच्या वतीने सांगण्यात आलंय. नाताळच्या सुट्ट्यामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून, आज लाखांहून अधिक भाविक शिर्डीत दाखल झालेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेलेत. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहेत.

Last Updated : Dec 25, 2024, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details