मुंबई MLC Election 2024 : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळालेले सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत. नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांनी दादर येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील त्याला जोरदार उत्तर देण्यात आलं आहे.
सदाभाऊ खोतांच सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं :विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 जागा निवडून आल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळत आहे. नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यात कापूस, कांदा, दूध, ऊस अशा पिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर गावगाड्यातील तरुणांचेही प्रश्न आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ते उद्योजक व्हावे ही भावना मनात ठेवून अशा प्रकारच्या चळवळीत मी काम करत आहे." लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून गावगाड्याकडे बघावं अशा प्रकारची आपली भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बळीराजाला वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जाऊ दे, शेतकऱ्याचं शिवार हिरवंगार होऊ दे, शेतकऱ्यांच्या धान्याला सोन्याचा भाव मिळू दे, असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला 9 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेल्या महाविकास आघाडीचे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. याविषयी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, "नेहमी चर्चा गावगाड्यांच्या आणि फाटक्या माणसाच्या होतात. मात्र वाड्याच्या होत नाही. प्रस्थापितांना धक्का मिळाला हे कालच्या निकालावरून सिद्ध झालं आहे."
जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला : महाविकास आघाडीतील काही मतं फुटल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, "काँग्रेस पक्षानं चिंतन करायला हवं. राज्यातील महायुती विकासाच्या दिशेनं निघाली आहे. महाविकास आघाडीतील नेते सरंमजानशाही आणि प्रस्थापित नेते आहे. जयंत पाटील यांनी शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी महाराष्ट्रात उभ्या केल्या. परंतु जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणतात मग जयंत पाटील यांच्यासारखा लढवू नेत्याचा घात का केला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेकाप संपवण्याचं काम शरद पवारांचं : शेकापचे जयंत पाटील यांचा घात नेमका कोणी केला? शरद पवारांनी केला की उद्धव ठाकरेंनी? या प्रश्नावर खोत म्हणाले, "महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. स्वतःकडे सत्ता येतं असेल तर ते वाटेल ते करत असतात. राज्यातील शेकाप संपवण्याचं काम शरद पवार यांनी केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सत्ता स्थापन करताना, भाजपाची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात मग जयंत पाटलांसाठी उद्धव ठाकरे यांनी का ऐकलं नाही? हा पवारांनी टाकलेला डाव होता. या डावात जयंत पाटील यांचा बळी गेला." असा खळबळजनक दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
प्रसिद्धीसाठी शरद पवारांचं नाव :विधान परिषद निवडणुकीत शेकापाचे जयंत पाटील यांच्या पराभवावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलय. "शरद पवार यांनी काय करावं याकडे लक्ष देण्यापेक्षा विधान परिषदेच्या कामकाजावर लक्ष घालावं. शेकापाचे जयंत पाटील आमचे सहकारी अर्थात महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती. आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र नेमकं कुठे काय घडलं? याविषयी मंथन होईल. सदाभाऊ खोत यांनी आग लावण्याचं काम करू नये. शरद पवारांचं नाव घेतल्यानंतर प्रसिद्धी लवकर मिळत असते. ज्या नेत्यांचे कर्तृत्व शून्य असतं ते नेते शरद पवार यांचे नाव टिकेच्या माध्यमातून घेतात आणि प्रसिद्धीच्या झोतात येतात. भाजपाकडे अशा अनेक नेत्यांची फौज आहे. टिका करून शरद पवाराचं नाव घेतलं की हेडलाइन होते. त्यासोबतच दोन दिवस प्रसिद्धी मिळते. त्या यादीमध्ये सदाभाऊ यांचा देखील समावेश आहे." असं म्हणत महेश तपासे यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा
- विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024
- काँग्रेसची 8 मतं फुटली; संतापलेले नाना पटोले म्हणाले, "बेईमान लोकांना दाखवणार बाहेरचा रस्ता" - MLC Election Results
- अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचं राजकीय भाषण, महामंडळाच्या स्थापनेची घोषणा - Eknath Shinde