मुंबई Lavasa case :पुणे जिल्ह्यातील लवासाच्या प्रकल्पासंदर्भातील केले गेलेले आरोप शरद पवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जात फेटाळले आहेत. हे आरोप निराधार असल्याचं म्हणत याबाबत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने संधी द्यावी असा न्यायालयामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. तर, शरद पवार यांच्या हस्तक्षेप अर्जावर याचिका करताना नानासाहेब जाधव यांना दोन आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील लावासा प्रकल्पा संदर्भात तत्कालीन शासनातील मंत्र्यांनी बेकायदेशीर कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये शरद पवार, अजित पवार, आणि सुप्रिया सुळे यांनी दबाव टाकला असा आरोप करत नानासाहेब जाधव यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. रिट पिटीशनमध्ये शरद पवार आणि इतरांना प्रतिवादी करता येत नसल्याने जाधव यांनी क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. आता या प्रकरणात शरद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यामध्ये हे सर्व आरोप निराधार आहेत असं म्हणत आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करायची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
लवासा काय आहे : लवासा हे हिल स्टेशन किंवा शहर हे 15 डोंगर आणि घाटामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ जवळपास 25 हजार एकर किंवा 100 चौरस किलोमीटर एवढं आहे. क्षेत्रफळाचा विचार करता पॅरिस शहराएवढा आकार या शहराचा आहे. याठिकाणी तयार करण्यात आलेला मानवनिर्मित तलाव हा 90 लहान मोठ्या झऱ्यांपासून तयार केलेला आहे. त्याची खोली जवळपास 100 फूट आहे. या शहरामध्ये जवळपास 2 लाख लोक राहू शकतील अशा पद्धतीनं ते तयार करण्यात येत आहे. हे शहर पूर्णपणे तयार झाल्यानंतर दरवर्षी याठिकाणी 20 लाख पर्यटक येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या शहरामध्ये पर्यटकांसाठी पंचतारांकित असा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय रुग्णालय, फाईव्ह स्टार हॉटेल, शाळा, पोस्ट ऑफिस अशा सुविधाही आहेत.