मुंबई : 20 वी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon 2025) आज (19 जाने.) पार पडली. या मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. टाटा मॅरेथॉन व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, या मॅरेथॉनमध्ये 63 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. या मॅरेथॉनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच एकत्र धावतांना दिसतात. याच मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ लेखक आणि गीतकार गुलजार (indian poet and lyricist Gulzar) हेदेखील लहान मुलांसोबत काही अंतर चालताना दिसले.
'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना काय म्हणाले गुलजार? : यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना गुलजार म्हणाले की, "आरुषी या संस्थेसाठी मागील काही वर्षांपासून मी इथं येत असतो. ही संस्था दिव्यांग, स्पेशल चाईल्ड अशा मुलांना शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, पोषण, आरोग्यसेवा देते. या मुलांना शालेय शिक्षणासोबतच कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे आणि समाजात ताठ मानेनं जगायला शिकवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे", असं गुलजार यांनी सांगितलं.
पुढं बोलताना गुलजार म्हणाले, "यातील काही मुलांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना कमी दिसतं. 'आरुषी' ही संस्था या मुलांना नेहमीच मदत करत आली आहे. या मुलांसाठी मी दरवर्षी टाटा मॅरेथॉनमध्ये थोडं अंतर का होईना चालत असतो. आरुषी ही एक चळवळ होती आणि चळवळ राहील. ही चळवळ नवीन गोष्टी स्वीकारण्यास तयार राहते. तसंच अपंगांना ‘विशेष घरं’ आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, हा या संस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे."
हेही वाचा -