शरद पवार यांची पत्रकार परिषद पुणेSharad Pawar News :राज्याच्या विकासासाठी भाजपासोबत गेल्याचं काही लोक सांगत आहेत. मात्र, त्यांच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही. तपास यंत्रणांकडून काही नेत्यांची चौकशी सुरू होती. 'ती' चौकशी सत्तेत आल्यानंतर बंद झाली. त्यामुळं विकासासाठी त्यांनी पक्ष सोडला, असं म्हणणे चुकीचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
विरोधी नेत्यांवर केलेल्या कारवाई :यावेळी शरद पवार यांनी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) विरोधी नेत्यांवर केलेल्या कारवाईवर भाष्य केलंय. आज देशात जो कोणी भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात भूमिका घेतो, त्याच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केला जातोय. यापूर्वी महाराष्ट्रात 'ईडी' हा शब्द कोणालाच माहीत नव्हता. पण, गेल्या काही वर्षांत ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला. 2014 ते 2023 या कालावधीत ईडीनं एकूण सहा हजार गुन्हे दाखल केले आहेत.
ईडी कारवाईत भाजपाचा एकही नेता नाही : ईडीनं दाखल केलेले गुन्हे तपासल्यानंतर सहा हजारांपैकी केवळ 25 गुन्हे सत्य असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र, या 25 पैकी केवळ दोघांनाच शिक्षा झालीय. ईडीच्या या सर्व कामावर जवळपास 404 कोटी रुपये खर्च झाल्याचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले. ईडीनं कोणाची पाठराखण केली, हेही बघायला हवं. गेल्या काही वर्षांत 18 हजार 147 नेत्यांची चौकशी करण्यात आली. यातील 85 टक्के नेते विरोधी पक्षांचे आहेत. भाजपा सत्तेत आल्यापासून ईडीचा वापर हत्यार म्हणून केला जात आहे. भाजपाच्या काळात 121 नेत्यांवर ईडीनं कारवाई केली होती. मात्र, ईडीनं कारवाई केलेल्यांमध्ये भाजपाचा एकही नेता नाही, याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
गांधी-नेहरूंवर टीका करणं शहाणपणाचे लक्षण नाही :भाजपाकडून सत्तेचा वापर करताना देशात काही धोरणं राबवली जात आहेत. ही धोरणं सामाजिक एकसंधतेला मारक आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज नुकतंच संपलं. पंतप्रधान मोदींचं राज्यसभेतील भाषण तुम्ही ऐकलंच असेल. ते त्यांच्या भाषणात काय म्हणाले? त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. या कुटूंबानं स्वातंत्र्य चळवळीत 13 वर्षे तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशाला लोकशाही शासन देणाऱ्या जनतेवर वैयक्तिक हल्ले करून पंतप्रधान मोदींनी काय साधले? असा सवाल शरद पवार यांनी केला. देशाला विचार आणि दिशा देणाऱ्यांवर टीका करणं, ही आजच्या राज्यकर्त्यांची भूमिका आहे. हे शहाणपणाचं लक्षण नाही, असं शरद पवार म्हणाले.
- राज्य सरकार झुंडशाहीच्या मार्गानं :राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे. सध्याचं सरकार झुंडशाहीच्या मार्गानं जात असल्याचं दिसते. पण जनता हुशार आहे. जनता योग्य वेळी सर्व घटना लक्षात ठेवून भाजपाला योग्य धडा शिकवेल, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.
- गृहमंत्र्यांनी जबाबदारी टाळणंही चिंताजनक :सुरक्षेची सर्व जबाबदारी राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांची आहे. गृहमंत्र्यांनं जबाबदारी टाळणंही चिंताजनक आहे. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. मात्र, देवेंद्र फडवणीस यांना जबाबदारी घेण्याचं महत्त्व दिसत नाही, अशी टीका पवारांनी गृहमंत्री फडणवीसांवर केलीय.
हे वाचलंत का :
- रोहित पवारांचा संजय राऊतांना सवाल; गुन्हेगारांबरोबर देवेंद्र फडणवीसांचे फोटो बाहेर येत नाहीत?
- मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्ड गँग चालवते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा मोठा खुलासा; वर्षाला विकले जातात 'इतके' अनाथ, अपंग, विकलांग