कोल्हापूर Sharad Pawar in Kolhapur :शरद पवार यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी पक्ष मी काढला अन् चिन्ह अजित पवार गटाला दिलं हा सत्तेचा गैरवापर आहे. तसंच निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याबाबत काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा यासाठी माझ्यासह खरगे, डी राजा, तृणमूल काँग्रेसनंही निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
इंडिया आघाडीत मतभेद : इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी एकत्रित कांम करावं. राज्याच्या घटक पक्षांनीही एकत्र बसावं आणि सर्व विषयांवर चर्चा करावी. काही ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये वाद-विवाद आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधे थोडे वाद आहेत, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
जागावाटपावर चर्चा सुरू : निवडणूक जागावाटपाबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आम्ही विचार करत असल्याचं शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीनं सर्व घटकांशी चर्चा करावी अशी आंबेडकर यांची भावना आहे. जागावाटपाबाबत प्रत्येक पक्षाच्या काही अपेक्षा असतात. त्यावरही सखोल चर्चा सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले.