मुंबईSunil Tatkare :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना बहाल करण्यात आलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्देश दिले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जागा वाटपाचा निर्णय परवा :महायुतीच्या जागावाटप संदर्भात अंतिम बैठक दिल्लीत कधी होणार? या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, "दिल्लीत महायुतीची बैठक दोन दिवसात होईल असं स्पष्ट केलं होतं; मात्र ती बैठक आज होणार नाही. परवा दिल्लीत अंतिम बैठक होऊन 48 जागांवर महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परवापर्यंत जागा वाटपाचा सन्मानपूर्वक फॉर्मुला निश्चित होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित होण्यास वेळ लागत आहे. याचं कारण म्हणजे, 45 प्लस स्ट्रॅटर्जी ठरवत असताना सगळ्याच गोष्टींचा आढावा घेत आहो. त्यामुळे विलंब होत आहे."
उलट त्यांनाच चपराक : "घड्याळ चिन्ह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टीप लिहावी लागणार असल्याचं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. बाष्कळपणा आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह आम्हाला वापरण्यासाठी दिल्यानंतर हे चिन्ह आम्हाला मिळू नये आणि ते रद्द करण्यात यावं अशा प्रकारची याचिका होती. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता आणि घड्याळ चिन्ह आम्हाला वापरण्यासाठी दिलं आहे ते पूर्णपणे रद्द करावं, त्याला स्थगिती द्यावी हा अट्टाहास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. उलट आम्हाला घड्याळाचं चिन्ह वापरण्यास परवानगी दिल्यानं त्यांनाच उलट चपराक बसली आहे", असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.