नवी दिल्ली NCP Political Crisis : अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
अजित पवार गटाकडून कॅव्हेट :शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी वकील अभिषेक जेबराज यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटानं वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं होतं. कॅव्हेटचा अर्थ असा की, न्यायालय जेव्हा जेव्हा या खटल्याची सुनावणी करेल, तेव्हा अजित पवार गटाची बाजू जाणून घेऊन निकाल देईल.
निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया : 6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दणका देत अजित पवार गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्याचा निकाल दिला होता. या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव मिळालं. या निकालावर प्रतिक्रिया देताना, आपण आपला लढा सुरूच ठेवणार असून पुन्हा पक्षाला आणखी उंचीवर नेणार असल्याचं शरद पवार म्हणाले होते. तसेच ते पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेऊ शकतात, मात्र माझं मनोबल नाही, अशी गर्जना त्यांनी केली होती.
निवडणूक आयोगाचा निकाल :महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 81 आमदार असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं होतं. त्यापैकी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थनार्थ 57 आमदारांची शपथपत्रं सादर केली, तर शरद पवार यांच्याकडे केवळ 28 प्रतिज्ञापत्रं होती. हे पाहता, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करू शकतात, असा निष्कर्ष आयोगानं काढला.
हे वाचलंत का :
- अजित पवारांची खेळी; शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याअगोदर 'कॅव्हेट' दाखल