मुंबई Kirit Somaiya : भ्रष्टाचाराची एकाहून एक प्रकरणं बाहेर काढून विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचं काम सध्या किरीट सोमैया करत आहेत. किरीट सोमैया यांनी ज्यांच्यावर यापूर्वी आरोप केले आणि नंतर ते भाजपसोबत गेले त्यांच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई थंडावली असाही आरोप सोमैया यांच्यावर होत आहे. या सर्व प्रश्नांना किरीट सोमैया यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. किरीट सोमैया म्हणाले आहेत की, तत्कालीन ठाकरे सरकारमधील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावणं ही तेव्हाची राजकीय गरज होती. जर का तसं झालं नसतं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपा, विरोधकांना संपवलं असतं. तसंच, विरोधकांना जेलमध्ये टाकलं असतं असंही किरीट सोमैया म्हणाले. तसंच, आम्ही कुठल्याही भ्रष्टाचारी नेत्याची केस मागे घेतलेली नाही. त्यांच्यावर कारवाई सुरूच आहे. यापुढे भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तसं, झालं तर किरीट सोमैया पुन्हा-पुन्हा आवाज उठवणार. त्याच प्रकारे सत्तेमधील नेत्यांचाही भ्रष्टाचार समोर आला तर मी ऐकणार नाही, असंही या प्रसंगी किरीट सोमैया यांनी सांगितलं.
मातोश्रीची प्रकरण बाहेर काढा, देवेंद्र फडणवीस यांचा आदेश: मातोश्रीवर अटॅक करा असं तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का? या प्रश्नावर बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, मी पक्षाचा शिस्तबद्ध असा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला ज्या-ज्या वेळी जे-जे सांगितलं ते ते मी केलं आहे. मातोश्रीचा भ्रष्टाचार असेल किंवा हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार हे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं, संशोधनाचं काम माझं होतं. आक्रमकपणा माझा होता. पण हे भ्रष्टाचार बाहेर काढण्यापूर्वी आम्ही राजकीय चर्चा करतो त्यानंतर 'गो अहेड' असा पक्षाकडून आदेश आल्यानंतर मी कामाला सुरुवात करतो. उद्धव ठाकरे यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती. परंतु मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे. तो थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मातोश्री व त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त करण्यासाठी मला हे भ्रष्टाचार बाहेर काढावे लागले. देवेंद्र फडवणीस तसंच दिल्लीतील नेतृत्वाला ते पटलं. परंतु मी उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्टाचाराबद्दल शांत होतो. पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश आहे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची संबंधित असेल तो भ्रष्टाचार बाहेर काढायलाच हवा अशी मुंबईसाठी माझी वचनबद्धता आहे आणि तो पक्षाचा निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने मी ते भ्रष्टाचार बाहेर काढले असंही किरीट सोमैया म्हणाले.
हेही वाचा :