नाशिकShantigiri Maharaj: लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अशात शांतिगिरी महाराज यांनी 2009 साली छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो आणि नावाचा वापर निवडणुकीत केला नव्हता. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव झाला होता. यंदा मात्र शहरात ठिकठिकाणी शांतिगिरी महाराज यांच्या कडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या फोटोचा देखील वापर करण्यात आला आहे. याला मात्र श्री जनार्दन स्वामी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी विरोध दर्शवत होर्डिंगवरील संत जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो तत्काळ काढावा, अशी मागणी केली आहे.
शांतिगिरी महाराज जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी नाही :स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहे. मात्र, स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी नाहीत. श्री सद्गुरू जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर राजकारण, पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापासून दूर होते. शांतिगिरी महाराज यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटो निवडणुकीच्या कामी वापरू नये. लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या प्रचार पत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो असून पत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामींची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे प्रचार पत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसेच भक्त मंडळांचा सक्त विरोध आहे, असं मत संस्थेचे विश्वस्त दिलीप जोशी यांनी व्यक्त केलं आहे.