मुंबई Ujjwal Nikam Lok Sabha Candidate : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपांनं मोठा डाव खेळला. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडं भाजपानं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केलाय.
वर्षानुवर्षे तुम्ही मला आरोपींविरुद्ध कोर्टात लढताना पाहिलं. आता भाजपानं मला नवीन जबाबदारी दिली. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे. मला माहिती आहे की, राजकारण माझ्यासाठी नवीन आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, देशाचे संविधान, कायदे आणि सुरक्षा हे माझे प्राधान्य असेल. मला उमेदवारी मिळालेला मतदारसंघ हा मुंबईचा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे - उज्ज्वल निकम, भाजपा उमेदवार
पूनम महाजन यांचा पत्ता कट : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपानं या जागेसाठी उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार असल्याचं वृत्त 'ईटीव्ही भारत'नं दिलं होतं. मात्र, या जागेसाठी भाजपा कोणाला उमेदवारी देणार याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. याच जागेवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र, भाजपानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.