सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलंय. अशातच जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. खंडाळा तालुक्यातील मोरवे येथे मतदानावेळी एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा तीव्र (Heart Attack) झटका आलाय. त्यानंतर तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. शाम नानासाहेब धायगुडे (67), असं त्यांचं नाव आहे. ते निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट होते. या घटनेमुळं मतदान केंद्रावर एकच खळबळ उडालीय.
बटन दाबलं अन् आला हार्ट ॲटॅक: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शाम नानासाहेब धायगुडे (67) हे मतदान केंद्रावर आले होते. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ईव्हीएम मशिनकडे गेले. त्यांनी बटण दाबले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते जागीच कोसळल्यानं मतदान केंद्रावरील कर्मचार्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, धायगुडे यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.