सातारा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कराड शाखेला दिलेल्या भेटीवेळी 'संघाच्या बाबतीत मतभेद असले तरी संघाकडे आपलेपणाने पाहावं', असं म्हटल्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून (RSS) दावा करण्यात आला. त्या घटनेच्या संदर्भात आरएसएसच्या वतीनं कराडमध्ये गुरूवारी बंधुता परिषद घेण्यात आली. त्यावेळी बोलताना 'दलित आणि ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी' असल्याचं वक्तव्य दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केलं. त्यांच्या विधानावरून आंबेडकरवाद्यांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सकटे काय म्हणाले? आरएसएसनं आयोजित केलेल्या बंधुता परिषदेत बोलताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले की, "आजवर पुरोगाम्यांच्या बोलण्यातच बंधुत्व दिसायचं. कृतीतून कधी दिसलंच नाही. अस्पृश्यतेचे चटके मी विद्यार्थी दशेपर्यंत सोसले आहेत. ओंजळीतून पाणी पिलो आहे. घागर घेऊन विहिरीवर तास न तास उभा राहिलो आहे. मंदिराला प्रदक्षिणा करू दिली नाही. चावडीवर बसायला आम्हाला विरोध होता. त्यामुळे कुठलं बंधुत्व आणि कसलं बंधुत्व? हा प्रश्न आम्हाला पडायचा. त्यामुळे बुद्ध सुखाच्या शोधात आणि आम्ही बंधुत्वाच्या शोधात बाहेर पडलो".
कोण जातीयवादी आणि कोणापासून सावध राहायचं? सकटे पुढे म्हणाले," कॉलेज शिक्षणासाठी विट्याच्या वसतिगृहात आलो. तिथे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी जी. डी. लाड. क्रांतीवीर नागनाथ नायवडी यांना बघायचो. त्यांना ऐकायचो. त्यांच्या भाषणात एकच असायचं, 'जातीयवादी आणि धर्मांधांपासून सावध राहा'. आपल्यात रात्रीचं लोक म्हणतात की विंचू-काट्यांपासून सावध राहा. तसं यांच्या भाषणात होतं. तेव्हा कोण जातीयवादी आणि कोणापासून सावध राहायचं, असा प्रश्न पडायचा".
पुरोगामी आणि डाव्यांनीच डावललं- पुढे सकटे म्हणाले, " मला आयुष्यात पुरोगामी आणि डाव्यांनीच डावललं. तरी त्यांचा डाव काही कळला नाही. आम्ही गावात अस्पृश्य आणि शहरात मागासवर्गीय होतो. विद्यापीठात जाऊन खूप वाचलं. आरएसएसच्या विरोधात वाचलं. त्यामुळं आरएसएस म्हणजे साप आहे, असंच डोक्यात शिरलेलं. विद्यापीठात जसा आंबेडकरवादी, पुरोगामी झालो तसा ब्राम्हण विरोधीही झालो".
शरद पवार सोयीच्या राजकारणाचे, घराणेशाहीचे समर्थक- "दलित महासंघाची १९९२ ला स्थापना केली. तेव्हापासून आंबेडकरवाडी, पुरोगामी, डावा, विद्रोही, असा माझा प्रवास झाला. १९९९ ला शदर पवारांसोबत माझं राजकारण सुरू झालं. देशाचा नेता शरद पवार, पुरोगामी नेता शरद पवार, असं सगळ्यांचं मत होतं. परंतु, त्यांच्याकडूनच माझी घोर निराशा व्हायला लागली. सोयीच्या राजकारणाचे आणि घराणेशाहीचे ते समर्थक आहेत. दलितांना कडीपत्त्याचंसुद्धा स्थान नाही, हे लक्षात आलं. सध्या शरद पवार हे नकली मागासवर्गीयांना सोबत घ्यायला लागलेत," असा आरोपही सकटे यांनी केला.
पुरोगाम्यांच्या कृतीत स्वातंत्र्य, समता, बंधुता कुठाय? "काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून २०१९ ला मी बाजूला झालो. त्याचं कारणच हे आहे की, पुरोगामी लोकांच्या कृतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता कुठे आहे? काँग्रेसनं प्रतिभा पाटील यांना पहिली महिला राष्ट्रपती केलं. भाजपानं आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती केलं. खराखुरे मागासवर्गीय रामनाथ कोविंद यांना भाजपानं राष्ट्रपती केलं. हे चित्र पाहता तुमच्या कृतीत काय आहे, हे महत्वाचं आहे", असा टोलाही त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लगावला.
आंबेडकर, हेडगेवारांचं काम विश्व बंधुत्वाच्या भावनेतून- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार हे दोघेही विश्व बंधुत्वाच्या भावनेतून काम करत होते, असं प्रशस्तीपत्रच सकटे यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, " मतभेद सोडले तर दोघांच्या आयुष्यात बरंच साम्य आहे. १९२० ला डॉ. हेडगेवार हे काँग्रेसच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या संपर्कात आले. त्याचवेळी डॉ. आंबेडकर हे शाहू महाराजांच्या संपर्कात गेले. बाबासाहेबांनी काळाराम मंदिर आणि हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केलं. हेडगेवारांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान आहे. परंतु, पुरोगामी लोक हेडगेवार आणि सावकरांबद्दल विचित्र बोलतात. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाला हेडगेवार आणि बाबासाहेबांचाही विरोध होता. ब्रिटीशांपासून भारत मुक्त झाला पाहिजे, असं हेडगेवारांना वाटत होतं. तर उच्च वर्णियांपासून दलित मुक्त झाला पाहिजे, असं बाबासाहेबांचं मत होतं. देशात हिंदुत्व आणायचं असेल तर आणा. पण जातीच काय करणार, हा बाबासाहेबांचा मुख्य सवाल होता. बहुतेक हाच त्यांच्यातील मतभेदाचा मुद्दा हाच असू शकतो," असा शोधदेखील सकटे यांनी लावला.
ब्राम्हण घर सोडून पळाले म्हणून अमेरिकेपर्यंत गेले- आम्हाला गावागावात बंधुत्वाची गरज असल्याचं सांगून सकटे म्हणाले, "आमच्या गावात ब्राम्हणच नाही. तरी मला ओंजळीने पाणी वाढायचे. कोण करत होतं अन्याय? त्यामुळं दलित आणि ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी आहेत. ब्राम्हणांनी घरं का सोडली. तर त्यांची घरं जाळली. आमचीही जाळतात, पण आम्ही जाणार कुठं? म्हणून तिथंच आहे. गाव सोडलं म्हणून ब्राम्हण अमेरिकेपर्यंत गेले. आम्हाला शहरातसुद्धा जाता येईना".
मच्छिंद्र सकटे हे संघ शाखेचे स्लीपर सेल- मच्छिंद्र सकटे यांच्या विधानानंतर आंबेडकरवादी कार्यकर्ते संतापले आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते प्रा. प्रशांत प्रक्षाळे म्हणाले," मच्छिंद्र सकटे हे संघ शाखेचे स्लीपर सेल आहेत. आंबेडकरवाद चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासाची मोडतोड करण्याचा राज्यकर्त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीनं इतिहास मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संघ शाखेतून चाललेला हा खोडसाळपणा आंबेडकरवाद्यांना नेमकेपणाने समजतोय. अशा भ्रामक कल्पनांवर आंबेडकरी समाज विश्वास ठेवणार नाही".