मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबई विद्यापीठानं सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचं परिपत्रक काढलं होतं. त्यामुळं शिवसेना उबाठाच्या युवा सेनेतर्फे त्याचा निषेध करण्यात आला होता. युवा सेनेतर्फे या विरोधात तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. त्यावरून आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सिनेट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार हे विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून, त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला जातोय आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. तर महाविकास आघाडीतील प्रत्येक जण मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
आधी नोंदवण्यात आलेले पदवीधर हे उबाठा सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर :सिनेटच्या मंगळवारी होऊ घातलेल्या निवडणुका अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपाची इच्छा आहे. जे उमेदवार उबाठा गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली जात आहे. बोगस मतदार नोंदणी झाली, तेव्हा आम्ही आक्षेप घेतला होता, असं म्हणत आधी नोंदवण्यात आलेले पदवीधर हे उबाठा सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते. निवडणुकीत राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत, अशी कुलगुरूंना विनंती असून, अभाविप विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना आहे, असेही आशिष शेलार यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्यमंत्र्यांवरील आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे, मात्र अभाविपच्या मताशी भाजपा सहमत नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस अन् राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी:अजित पवारांसाठी भाजपा अन् शिंदेंचं चक्रव्यूह अशा बातम्यांसंदर्भात विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, ही कपोलकल्पित बातमी आहे. भाजपा, शिंदे सेना आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद महाविकास आघाडी हरवून बसली आहे, म्हणूनच राजकीय षडयंत्र रचत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. उद्धव ठाकरे दिल्लीहून हात हलवत आले आणि त्यानंतर मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका मांडा असे काँग्रेसला आवाहन केले. पण काँग्रेसने त्यांना दाद दिली नाही अन् शरद पवारांनीही फटकारले. खरं तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असा दावाही अॅड. आशिष शेलार यांनी केला.