मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र शाळेला देण्यात आलं आहे. हे पत्र शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलं आहे. या पत्रात माजी विद्यार्थी, पालक यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक गोडी कशी लागेल, याबाबत माहिती दिली आहे. तसेच हे पत्र विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासोबत सेल्फी घेऊन ते परत शाळेला द्यायचं आहे. मात्र या 'सेल्फी विथ सीएम'ला आणि 'सेल्फी विथ फॅमिली' पत्राला पालक वर्गातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. सरकारचं म्हणणं आहे की, हे एक शैक्षणिक अभियान आहे. पण जर हे शैक्षणिक अभियान आहे. तर मग त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी कशासाठी? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेलं पत्र आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचा फोटो याला शहरी आणि ग्रामीण भागात मोठा विरोध होताना दिसत आहे.
लीप ईयर की लींक इयर? :दुसरीकडं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम शिक्षकांना दिलं होतं. यानंतर आता शैक्षणिक अभियान याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्र दिलं आहे. पत्रासोबत पालकांचा फोटो आवश्यक असल्याचं शासनानं म्हटलं आहे. पण, या कामामुळे शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ देता येत नाही. तर दुसरीकडं याच महिन्यात शासनाकडून अनेक लिंक पाठवल्या जात आहेत. या लिंक ओपन करून त्यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेची माहिती, शिक्षकांची माहिती तसेच अन्य माहिती भरण्यास शिक्षकांना सांगितलं जातं. रोज विविध लिंक पाठवून ती भरण्यास शिक्षकांना सांगितलं जात आहे. त्यामुळे आम्ही शिकवणी सोडून शासनाची हीच काम करायची का? मुलांना शिकवायचं की नाही? असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. परीक्षा जवळ आल्या असताना अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. परंतु, शासनाच्या या कामामुळे आमच्या शिकवणीकडे दुर्लक्ष होत आहे, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये शासनाच्या या विविध कामामुळे शिक्षकात संतापाची लाट दिसून येत आहे.