ठाणे School For Grandmothers : शिक्षणाला कोणतीच अट नाही आणि वयाची तर नाहीच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरस्वतीची आराधना करून ज्ञानार्जन करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु आर्थिक किंवा इतर कारणांमुळं अनेकांना या बहुमोल ठेवी पासून वंचित रहावं लागतं. आपल्या आसपास अशा अनेक वयोवृद्ध महिला अथवा आजीबाई असतात ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असून देखील काही कारणास्तव शिक्षण घेणं शक्य झालं नाही. अशा आजींसाठी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शांतीनगर मधील आजीबाईंची शाळा एक वरदान ठरत आहे. आतापर्यंत केवळ लहान मुलांचा ऐकू येणारा किलबिलाट आता आजीबाईंच्या किलबिलाटात रुपांतरीत झाला आहे. तब्बल 60 ते 80 वर्षांच्या 17 आजीबाई दर मंगळवारी आणि शनिवारी या शाळेत आवर्जून हजेरी लावतात.
सोशल मीडियाचंही दिलं जातं प्रशिक्षण :दुपारी चार ते साडेपाच पर्यंत या सर्व आजीबाई पाढे पाठ करणे, मुळाक्षरे गिरवणे यात दंग झालेल्या दिसतात. पहिला एक तास अभ्यास आणि नंतरचा अर्धा तास गाणी आणि ओव्या यांच्यामध्ये वेळ कधी निघून जातो ते कोणालाच कळत नाही. जयश्री फाउंडेशनच्या माधवी पाटील या त्यांच्या शिक्षिका असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आजीबाई अत्यंत मन लावून गेले चार महिने शिक्षण घेत आहेत. "बाई आम्ही आपले विद्यार्थीच आहोत, त्यामुळं आम्हाला चुकलं तर ओरडा, रागवा" असं सांगायला देखील या सर्व आजीबाई विसरत नाहीत. जयश्री फाउंडेशन आणि के व्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे हरेश गोगरी यांच्या माध्यमातून ही शाळा सुरु असून येथे अगदी लहान मुलांच्या शाळेसारखे हलकेफुलके वातावरण असते. सध्या डिजिटल युग असल्यानं या अजीबाईंना देखील स्वतःचं नाव, पत्ता सांगता यावा, मोबाईल मधील सोशल मीडिया सारखे अॅप सहज हाताळता यावे यासाठी देखील त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.