हैदराबाद :महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाज व्यवस्थेविरोधात महात्मा ज्योतिाब फुले आणि सावित्री फुले यांनी एल्गार पुकारला. त्यांच्यामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्यानं खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अगोदर सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं. त्यामुळे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई या केवळ समाजसुधारक होत्या असं नाही, तर त्या तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता निसर्ग, शिक्षण आणि जातिव्यवस्थेचं निर्मूलनावर केंद्रित होत्या. देशात जातीव्यवस्था शिगेला पोहोचली, त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाहांनादेखील प्रोत्साहन दिलं.
जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय : सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव इथं खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी झाला. त्या काळात मागासवर्गीयांना भेदभावाची वागणूक मिळायची. मागासवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना अजिबात शिकण्याची परवानगी नव्हती. पण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण तर घेतलंच वर त्यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. सावित्रीबाई लहान असताना त्यांना एक इंग्रजी पुस्तक मिळालं. त्यांच्या हातातलं पुस्तक खंडोजी पाटलांनी पाहिल्यावर त्यांनी ते हिसकावून फेकून दिलं. यावेळी त्यांनी सांगितंल की केवळ उच्च जातीतील पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार आहे. मागासवर्गीय आणि महिलांना शिक्षण घेऊ दिलं जात नाही. या गोष्टीचा लहानग्या सावित्रीबाईंच्या मनावर मोठा परिणाम झाला. पुढं ज्योती सावित्रींनी मिळून फक्त मागासवर्गीयचं नाही, तर मुलींनाही शिक्षणाची दारं खुली करुन दिली. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर सावित्रीबाईंनी वयाच्या 18 व्या वर्षी मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी शिकवलेल्या मुली शिक्षणानंतर शाळांमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून इतरांना शिकवत होत्या.
किती होतं सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण :सावित्रीबाई फुले यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. मात्र, वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. लग्न झालं तेव्हा सावित्रीबाई निरक्षर होत्या, तर ज्योतिबा फुले हे तिसरीत शिकत होते. लग्न झाल्यानतंर सावित्रीबाईंनी ज्योतिबा यांना शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ज्योतिबांनीही त्यांना मोठ्या मनानं परवानगी दिली. सावित्रीबाईंना त्यांनी शाळेत शिकण्यास पाठवलं. लग्न झाल्यानंतर सावित्रीबाईंना शाळेत जाणं सोपं नव्हतं. त्यामुळे ज्योतिबा सावित्रीबाईंना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. या दाम्पत्यावर कचरा, चिखल आणि दगडही मारण्यात आले. मात्र ज्योतिबाच्या सावित्रीनं हार मानली नाही. पुढं ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी घडवलेला इतिहास सगळ्यांना माहितीच आहे.