सातारा Lok Sabha Election Results 2024 :साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी दणदणीत पराभव करत भाजपाचं कमळ फुलवलं आहे. मतमोजणीत सुरुवातीच्या 14 फेऱ्यांपर्यंत शशिकांत शिंदे आघाडीवर असताना अखेरच्या फोऱ्यांमध्ये बाजी पलटली आणि उदयनराजेंनी पराभवाचं रूपांतर विजयात केलं.
14 व्या फेरीपासून चित्र पालटलं :राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. चौथ्या फेरीअखेर शिंदे हे 21 हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र, पुढच्याच फेरीत शिंदे यांची आघाडी 5 हजार 403 मतांवर आली. 13 व्या फेरीपर्यंत शिंदेंची आघाडी कमी जास्त होत होती. परंतु, 14 व्या फेरीपासून निकालाचा नूर पालटत गेल्यानं उदयनराजेंनी अनपेक्षित आणि धक्कादायक विजयाची नोंद केली. उदयनराजेंना 5 लाख 71 हजार 134 तर राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना 5 लाख 38 हजार 383 मते मिळाली. उदयनराजे 32 हजार 771 मतांनी विजयी झाले.
भाजपाचा साताऱ्यात ऐतिहासिक विजय : स्वातंत्र्यापासून आजअखेर सातारा जिल्ह्याने पुरागोमी विचारांना साथ दिली होती. परंतु, यंदा भाजपाने साताऱ्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून व्यूव्हरचना आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदयनराजेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यामुळं भाजपासाठी सातारची जागा निवडून आणणं आवश्यक बनलं होतं. राष्ट्रवादी उमेदवाराला अपेक्षा असणाऱ्या कराड दक्षिण आणि कराड उत्तरनं भ्रमनिरास केला आणि उदयनराजेंना साथ दिली.
उदयनराजेंचा 'पुष्पा स्टाईल' जल्लोष :उदयनराजेंचं मताधिक्क्य वाढत गेल्यानंतर समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरू केला. जलमंदिर पॅलेसमध्ये समर्थक मोठ्या संख्येनं जमले. तेथून उदयनराजेंची जल्लोषात मिरवणूक निघाली. ओपन जीप्सीमध्ये उभे राहून उदयनराजे राजपथावरून पोवई नाक्याकडं आले. 'झुकेगा नही साला', या पुष्पा स्टाईलनं उदयनराजेंनी तरूणाईसोबत मिरवणुकीत जल्लोष केला. पोवई नाक्यावर डीजेच्या तालावर तरूणाईचा बेभान जल्लोष सुरू होता. तसंच जेसीबीतून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
हे वाचलंत का :
- महाराष्ट्रात धक्कादायक निकाल; 'या' उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता, निकालाचं विश्लेषण वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election 2024 Results
- राज्यात महाविकास आघाडीमुळं महायुतीचं टेन्शन वाढलं; तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट - maharashtra lok sabha 2024 winner list
- अजित पवारांना 'दे धक्का'! बारामतीत सुप्रिया सुळेंचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंदबाईंना हरवलं - Baramati Lok Sabha Results 2024