नाशिक Paris Olympics : नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावचा रहिवासी असलेला सर्वेश कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात निवड झाली आहे. हरियाणातील पंचकुलात झालेल्या स्पर्धेत सर्वेक्षण 2.25 मीटर (7 फूट 38 मिलिमीटर) इतकी उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली आहे. उंच उडीमध्ये ऑलिम्पिकची पात्रता गाठणारा, तो महाराष्ट्रातील पहिला उंचउडीपटू ठरला आहे.
खेळासाठी पुरेसं साहित्य नाही : सुरेशनं जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर झेप घेत ऑलिम्पिक पात्रतेसाठी 2.24 मीटरची पात्रता त्यानं मागं टाकत अधिक गुण पटकवले आहेत. सर्वेशनं उंच उडीत खडतर प्रवास करून थेट ऑलिम्पिकपर्यंत मजल मारणे ही त्याच्यासाठी मोठी कामगिरी आहे. आधुनिक मॅट्ससह सुविधांचा अभाव असल्यानं देवगावमध्ये काही वर्षे सराव केल्यानंतर दुखापत होऊ नये म्हणून सुविधा असलेलं कॉलेज शोधलं. त्यासाठी सर्वेशनं सांगलीतील महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. मात्र, अनेक बाबींमध्ये पुरेशी साथ न मिळाल्यानं सर्वेशने पुन्हा नाशिक जिल्ह्यातील देवगावची वाट धरली. आपल्या घरच्या शेतातील मक्याच्या भुशाच्या पोत्यांपासून मॅट तयार करून राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं यश मिळविलं.
अजून चांगला प्रयत्न करणार :सर्वेश कुशारेनं हरियाणातील पंचकुला येथे 29 जून रोजी झालेल्या उंच उडी स्पर्धेत 2 मीटर 25 सेंटीमीटर उंच उडी घेत प्रथम क्रमांक पटकावला. आज तो जागतिक क्रमवारीत 23 वा आला असून पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी त्याचं स्थान निश्चित झालं आहे. सर्वेशची पत्नी रोहिणी यांनीही रिले क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत माझ्या शरीरानं चांगली साथ दिली, तरी पायाचा घोटा थोडासा दुखत होता. त्यामुळं 2.25 मीटर उडी मारू शकल्याचं समाधान आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत मी 2.27 मीटरचं ध्येय गाठलं होतं. आता देखील 2.30 मीटरसाठी सराव करत आहे. त्यामुळं ऑलम्पिकमध्ये चांगला प्रयत्न करून अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वास सर्वेश कुशारेनं व्यक्त केला.