बीड :मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चांगलंच राजकारण तापलं आहे. आज अंजली दमानिया यांनी मस्साजोग इथं भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली. यावेळी अंजली दमानिया यांनी शनिवारी निघालेला सर्वपक्षीय मोर्चावरही निशाणा साधला. कालचा आक्रोश मोर्चा केवळ राजकीय करियर वाचवण्यासाठी होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणावरुन राज्यभर मोठा गदारोळ उडाला आहे.
वाल्मीक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही :अंजली दमानिया यांनी बीड इथं जात संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत वाल्मीक कराड यांना अटक होत नाही. तीन आरोपी फरार होते, त्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही. रोज दहा ते बारा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाहेर थांबणार आहोत. मिळालेल्या माहितीचे तथ्य शोधून एकेक गोष्ट बाहेर काढणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
संतोष देशमुख हत्याकांड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, अंजली दमानिया आक्रमक (Reporter) 118 आमदारावर खून, बलात्कार अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे :महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. याबाबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, 288 आमदारांपैकी 118 आमदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यात खून, बलात्कार अशा भयानक गुन्ह्यांचा समावेश आहे. अशाप्रकारच्या आमदारांना शोधून काढणार आहे, त्याची सुरुवात बीडमधून करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वाल्मीक कराड यांच्यासारखी मोठी गँग कार्यरत आहे. वाळू माफिया, खंडणी, जमीन लाटणं असे प्रकार सर्रास होत आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ आणि पुरावे माझ्याकडे आले आहेत. बीड जिल्ह्यातील इतर राजकारणी ही गुन्हेगार आहेत. ते आम्हाला सांगावे, असं आवाहन जिल्ह्यातील लोकांना केलं आहे, असंही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- "न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा"- आमदार संदीप क्षीरसागर
- बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका
- बीड जिल्ह्यात 1281 पिस्तूल परवानाधारक; विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या किती?