मुंबई- सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी खासदार संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आष्टीचे भाजपाचे आमदार (भाजप) सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळानं म्हटले आहे.
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी म्हटलं, " आधीच उशीर झाला आहे. या प्रकरणात मुळात महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. हे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या पलीकडचं आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे".
- राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, " मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नाही. आम्ही घटनात्मक पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनामा मागत आहोत. बीडमध्ये यापूर्वीदेखील गुन्हे घडले आहेत. त्या प्रकरणांची चौकशी व्हावी. तिसऱ्या फरार आरोपीला अटक व्हावी". "बीड प्रकरणाला जातीय रंग देऊन नये," असेही आमदार आव्हाड यांनी म्हटलं.
- शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अंबादास दानवे म्हणाले, " सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्यादेखील गंभीर आहे. सरकार मुंडे आणि कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एसआयटीमधील चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत. सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सविस्तर मागणी ऐकली आहे".
काय आहेत शिष्टमंडळाच्या मागण्या?
- सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे हे हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, असे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था असलेले राज्य आहे, अशी भावना बळकट करावी, अशी मागणी शिष्टमंडळानं राज्यपालांडं केली.
- अपहरण, खंडणी आण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर बीएनएस 103 (जुना आयपीसी 302) अन्वये तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
- कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
- बीड जिल्ह्यातील जनतेचा विश्वास, सुरक्षितता पूर्ववत करण्याकरिता तसेच खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा.
मंत्रिपद काही सहज मिळत नाही-सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं. माजी मंत्री भुजबळ म्हणाले, "संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असेल त्याला फाशी द्या. गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा? धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणं योग्य वाटत नाही. मंत्रिपद काही सहज मिळत नाही. कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही. चौकशीत काहीच समोर आलं नाही, मग राजीनामा का मागता?" असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. पुढे आमदार भुजबळ म्हणाले, " कुणाची बाजू घ्यायची नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, एवढेच म्हणणं आहे. निरपराधाला शिक्षा होऊ नये, असे कायदा सांगतो. बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे. संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला. खून कसा झाला हे आमदार धस यांनी सांगितले तेव्हा अंगावर शहारे आले होते". उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांची जाहीरपणं नाराजी व्यक्त केली होती. असे असले तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात असताना भुजबळ यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांला जाहीरपणं समर्थन दिलं आहे.